आता तटकरे विरुद्ध तटकरे नाट्य रंगणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

रायगड जिल्ह्यात आपले राजकीय स्थान भक्कम केलेल्या सुनील तटकरे यांना त्यांचा पुतण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनीच आता आव्हान दिले आहे. 

महाड (बातमीदार) : रायगड जिल्हा म्हणजे तटकरे हे समीकरण बनलेल्या रायगड जिल्ह्याला आता तटकरे विरुद्ध तटकरे या नव्या राजकीय नाट्याला सामोरे जावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यात आपले राजकीय स्थान भक्कम केलेल्या सुनील तटकरे यांना त्यांचा पुतण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनीच आता आव्हान दिले आहे. शिवबंधनात अडकण्यासाठी सज्ज असलेल्या अवधूत तटकरे यांच्यामुळे आता रायगडमध्ये राजकीय रंगत अधिकच वाढणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये व राज्यात सुनील तटकरे यांचे नाव दिग्गज नेत्यांमध्ये घेतले जाते. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये स्थान असलेलेच तटकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्येही खासदारकी पदरात पाडून स्वतःचे राजकीय अस्तित्व व ताकद पुन्हा सिद्ध केली. मात्र, विरोधकांना नेस्तनाबूत करणाऱ्या सुनील तटकरे यांच्यापुढे आता भाऊबंदकीचा वाद उभा राहिला आहे. सुनील तटकरेंचे बंधू अनिल यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनमधील आमदार अवधूत तटकरे यांनी बंडाचे निशाण रोवले आहे. अनेक वर्षांपासून तटकरे कुटुंबातील हा राजकीय वाद चिघळतच आहे. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांत अवधूत व अनिल तटकरे कायम बाहेर दिसत. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळणे कठीण असल्याने अवधूत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अवधूत यांच्या प्रवेशाने रायगडच्या राजकारणात फारच मोठे धक्के बसतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. 

मात्र, शिवसेनेकडून या मतदारसंघातील इच्छुक असलेल्या उमेदवारांना अवधूत तटकरे यांचा प्रवेश अडचणीचा वाटत आहे. त्यातच काँग्रेस, शेकाप व राष्ट्रवादी अशी राजकीय मोट बांधण्यात सुनील तटकरे यशस्वी झाले असले, तरी विधानसभेत होणाऱ्या आघाड्यावर युती यावर जिल्ह्यातील गणिते बदलू शकतात. मुळात आक्रमक असलेल्या अवधूत यांना शिवसेना जिल्ह्यात किती ताकद देते, यावर त्यांचा पुढील प्रवास अवलंबून आहे.

अशी झाली घराणेशाहीत वादाची ठिणगी
सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. मुलगा अनिकेत हे विधान परिषदेचे आमदार आहेत. अनिल तटकरे यांचे चिरंजीव अवधूत तटकरे श्रीवर्धनचे आमदार असून, संदीप तटकरे या त्यांच्या दुसऱ्या मुलाने शिवसेनेत यापूर्वीच प्रवेश केलेला आहे. तटकरे कुटुंबामध्ये असलेला वाद राजकीय घराणेशाही आणि वारसदार यातून निर्माण झालेला वाद असावा, असा अंदाज आहे. श्रीवर्धनमधून अदिती तटकरे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाल्याने अवधूत तटकरे यांचा पत्ता कट होऊ शकतो, यातूनच अवधूत तटकरे यांनी शिवसेनेची वाट धरल्याचे बोलले जात आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांचा अल्पमताने झालेला पराभव तटकरे वादातील पहिली ठिणगी होती. 

शेकापशी आघाडीने विजय सुकर
रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अवधूत तटकरे यांचे भाऊ संदीप तटकरे यांना नगराध्यक्ष उमेदवारी मिळावी, अशी आग्रही भूमिका असतानाही त्यांना डावलून संतोष पोटफोडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. त्यातून दुखावलेल्या संदीप यांनी शिवसेनेत प्रवेश करून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती; परंतु त्यामध्ये ते पराभूत झाले. अशा सर्व घटनांमधून तटकरे कुटुंबातील वाद अधिकच चिघळला गेला. भविष्यामध्ये हा वाद वाढण्‍याची जाणीव झाल्याने सुनील तटकरे यांनी शेकापशी आघाडी केली. त्‍यामुळे २०१९ ला लोकसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांना विजय मिळाला. या वेळी श्रीवर्धन मतदारसंघावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केल्याने ३६ हजारांचे मताधिक्‍य त्यांच्या पदरात पडले आहे. त्यामुळे त्यांची मुलगी अदिती यांचा विधानसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tatkare V/s Tatkare in Shrivardhan