उल्हासनगर पालिकेचे टॅक्स वसुलीचे 100 कोटींचे मिशन

ullhasnagar.jpg
ullhasnagar.jpg

उल्हासनगर : मागच्या वर्षी मालमत्ता कर अर्थात टॅक्स वसुली 96 कोटींच्या घरात गेली होती. यावर्षी टॅक्स वसुलीचे 100 कोटींचे मिशन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी समोर ठेवले आहे. त्यासाठी 4 पथक प्रमुख व 14 विशेष सहाय्यक पथक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उल्हासनगरात पावणेदोन लाख मालमत्ता धारक असून चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्या दरम्यान 40 कोटींची वसुली झाली आहे. मार्च अखेरीपर्यंत वसुलीचे 100 कोटींचे मिशन पूर्ण करण्याचा निर्धार अच्युत हांगे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

त्यासाठी मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, मुख्यलेखाधिकारी विकास चव्हाण, नगररचनाकार मिलिंद सोनावणी, शहर अभियंता महेश सितलानी यांची पथकप्रमुख तसेच गणेश शिंपी, प्रतिभा कुलकर्णी, विजय मंगलानी, भगवान कुमावत, अजित गोवारी, संतोष जाधव, अशोक जाधव, दगडू वानखेडे, जितू चोईथानी, संदीप जाधव, यशवंत सगळे, परमेश्वर बुडगे, संजय पवार, धनराज चव्हाण, यांची सहाय्यक पथकप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हाताखाली कर निरीक्षक आणि स्थानिक बिट मुकादमाची जोडी देण्यात आली असून मदतीला एक वसुली लिपिक आणि एक वसुली सहाय्यक लिपिक देण्यात आला आहे. या पथकाने त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील किमान 10 मालमत्ता धारकांना दररोज भेट देऊन वसुलीची कारवाई करावी, असे लेखी आदेश आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे या पथकात प्राजक्ता कुलकर्णी या एकमेव महिला अधिकारीचा समावेश आहे. मागच्या वर्षी या पथकात तीन ते चार महिला उल्हासनगरात पावणेदोन लाख मालमत्ता धारक असून त्यांच्याकडून दरवर्षी जेमतेम 60-70 कोटींच्या घरात वसुली होत होती. मात्र मागच्या वर्षी तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी अभय योजना राबवली होती. या योजनेअंतर्गत दंडात्मक रक्कम माफ करण्यात आली होती. याशिवाय रॅली काढण्यात आल्याने व जनजागृती राबविण्यात आल्याने मुख्यलेखाधिकारी दादा पाटील, संतोष जाधव यांच्या देखरेखीखाली 96 कोटींच्या घरात वसुली झाली होती. चालू वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 40 कोटींची वसुली झालेली आहे. आता अवघे चार महिने बाकी असून अभय योजना नसल्याने 100 कोटींचे मिशन पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com