दोन हजार कोटींची करवसुली! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प वास्तववादी ठरला आहे. 

नवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प वास्तववादी ठरला आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य लेखा वित्त अधिकारी व मालमत्ता विभाग उपायुक्त धनराज गरड यांनी कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले. एलबीटी व मालमत्ता कर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने मनाई केल्यामुळे थकबाकी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर होते; मात्र तरीही गांधीगिरीने थकबाकीदारांची घरे, हॉटेलसमोर ढोल-ताशे बडवून पालिकेने थकीत मालमत्ता कर वसूल केला आहे. या उपक्रमामुळे महापालिकेला 2017-18 मध्ये 540 कोटींची वसुली करण्यात यश आले. एलबीटी व जीएसटी अनुदानानुसार महापालिकेला एक हजार 195 कोटींची वसुली शक्‍य झाली आहे. याशिवाय महापालिकेने नगररचना शुल्क विभागातून 105 व पाणीपट्टीतून 75 कोटींसह या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दोन हजार कोटींची करवसुलीची उद्दिष्टपूर्ती केली आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाने 644 कोटींची वसुली केली होती. त्या तुलनेत यंदा झालेली मालमत्ता करवसुली कमी असली, तरी ती जास्त असल्याचा दावा मालमत्ता कर विभागाने केला आहे. कारण गेल्या वर्षी नोटाबंदीमुळे जुन्या नोटा देऊन थकबाकी भरण्यासाठी दिलेली सूट व थकबाकीदारांवर केलेल्या कठोर कारवाईमुळे 644 कोटी वसूल करणे शक्‍य झाले होते, असे उपायुक्त गरड यांनी सांगितले; मात्र यंदा न्यायालयाने कठोर कारवाई करण्यास मनाई केल्यानंतरही 540 कोटींची वसुली झाल्याने महापालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे. 

विकासकामांना चालना 
दोन हजार कोटींच्या ठेवी व दोन हजार कोटींची करवसुली यामुळे पालिकेच्या तिजोरीत मोठी रक्‍कम या वेळी जमा झाली आहे. त्यामुळे वर्षभरात महापालिकेला मोठे प्रकल्प राबवण्यास वाव आहे. तसेच शहरातील विकासकामांवर खर्च करण्यासाठी मुबलक निधी उपलब्ध असल्याने या कामांना वेग येईल. 

महापालिकेच्या मालमत्ता, नगररचना व पाणीपट्टी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी वर्षभर केलेल्या योग्य नियोजनामुळे प्रशासनाला विक्रमी वसुली करणे शक्‍य झाले आहे. अनेक करांची देयके तयार करून मालमत्ताधारकांच्या घरी वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांनी योग्य रीतीने पार पडल्यामुळे चांगली वसुली करता आली. जीएसटीमध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत 300 कोटींचा अधिक निधी मिळाला आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Web Title: Taxes of two thousand crores mumbai municipal corporation