टॅक्‍सीचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने गाडीतच मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पुण्याहून प्रवासी भाडे घेऊन मुंबईत आलेल्या अविनाश गायकवाड (42) या खासगी टॅक्‍सीचालकाचा पुणे येथे परत जात असताना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे.

नवी मुंबई : पुण्याहून प्रवासी भाडे घेऊन मुंबईत आलेल्या अविनाश गायकवाड (42) या खासगी टॅक्‍सीचालकाचा पुणे येथे परत जात असताना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.19) सकाळी नेरूळ येथे घडली.

नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. 
या घटनेत मृत पावलेले अविनाश गायकवाड हे पुणे येथे वास्तव्यास असून ते ओला व उबेरच्या माध्यमातून स्विफ्ट डिझायर कार चालवत होते. सोमवारी रात्री अविनाश यांना मुंबईचे भाडे मिळाल्याने ते प्रवासी भाडे घेऊन मुंबईत आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास ते पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघाले होते. त्यांची कार मुंबई-पुणे मार्गावरील नेरूळ एलपी ब्रिजजवळ आली असताना, त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपली कार एलपी सिग्नलजवळ उभी केली.

या वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते आपल्या कारमध्ये कोसळले. नेरूळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तत्काळ डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
 

web title :Taxi driver dies in taxi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taxi driver dies in taxi