"टीडीआरएफ'नेही बजावली मोलाची कामगिरी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

एनडीआरएफच्या सोबतीने ठाणे महापालिकेच्या "ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने'ही (टीडीआरएफ) उल्लेखनीय कामगिरी बजावली.

मुंबई : उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वांगणी-बदलापूरदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या सोबतीने ठाणे महापालिकेच्या "ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने'ही (टीडीआरएफ) उल्लेखनीय कामगिरी बजावली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांच्या पथकातील जवान महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील शेकडो प्रवाशांसाठी देवदूत ठरले. 2017 अखेरीस स्थापन झालेल्या या पथकाची ही पहिलीच मोठी कामगिरी होती. त्यांनी बजावलेल्या कामगिरीचे आणि महापालिकेच्या समयसूचकतेचे कौतुक होत आहे. 

मुसळधार पाऊस आणि उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे महालक्ष्मी एक्‍स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून बदलापूर-वांगणीदरम्यान चामटोली गावाजवळ अडकली होती. पुराचे पाणी सतत वाढत असल्याने तसेच या पाण्यातून काही सापही बोगीत शिरत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. पहाटे या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून एनडीआरएफच्या जवानांना पहाटे 6 च्यादरम्यान एक्‍स्प्रेसमध्ये प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत त्यांना सूचना केल्या. आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सकाळी 6.30 वाजता टीडीआरएफच्या 20 जवानांना त्वरित घटनास्थळी दाखल होण्याची सूचना दिली. सदर पथक डेप्युटी कमांडंट अरुण राऊत यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 9.30 च्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर स्वतः सकाळपासून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नौदल, हवाई दलही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तैनात होते. एनडीआरएफ, टीडीआरएफ, स्थानिक प्रशासन यांच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात झाली. दुपारी 2 च्या सुमारास सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. 

एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने टीडीआरएफची (ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) स्थापना केली आहे. या पथकामध्ये एक उपकमांडंट आणि 40 प्रशिक्षित जवान कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हे पथक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत काम करते. 

बचावकार्यासाठी आधुनिक बोटी 
महालक्ष्मी एक्‍स्प्रेस प्रवाशांच्या मदतकार्यात आधुनिक पद्धतीच्या पॉलिमरच्या बोटी वापरण्यात आल्या. या बोटी पूर्णतः लिकेज प्रूफ आणि दगडावर आपटल्या तरीही त्यांना नुकसान पोहोचणार नाही अशा पद्धतीच्या आहेत. विभागाकडे दोन प्रकारच्या बोटी होत्या. एक बोट चार मीटर लांबीची होती. त्याची वाहकक्षमता एक हजार किलोची असून त्यात एका वेळेस आठ ते 10 व्यक्ती बसू शकतात. तसेच दुसरी बोट आठ मीटर लांबीची असून त्याची वाहकक्षमता पाच हजार किलोची आहे. त्यातून जवळजवळ 30 ते 35 व्यक्ती प्रवास करू शकतात. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटेपासून जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात होतो. एनडीआरएफ आणि टीडीआरएफ यासोबतच कल्याण डोंबिवली व स्थानिक प्रशासनाचेही आपत्ती निवारण पथक या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत नौदल आणि हवाई दलाचीही मदत मागवण्यात आली होती. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुटकेसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले याचे समाधान आहे. 
- एकनाथ शिंदे, पालकमंत्री. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tdrf plays important role in operation mahalaxmi