ठराविक शिक्षकांनाच निवडणुकीचे काम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई - आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत दहावी व बारावीच्या परीक्षा असतील. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन खासगी शाळांतील ठराविक कर्मचारीच निवडणुकांच्या कामांसाठी घेतले जातील, असे आश्‍वासन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शिक्षक परिषदेला बुधवारी दिले.

शिक्षण परिषदेचे शिवनाथ दराडे, अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी आज निवडणूक आयुक्‍तांची भेट घेतली. निवडणुकीच्या कामात मोठ्या प्रमाणावर खासगी अनुदानित शिक्षकांना जुंपण्यात येत असल्याचे निदर्शनास आणले. निवडणुकीच्या कामातून खासगी शाळांतील शिक्षकांना वगळण्याची मागणी केली. शिक्षक हे सरकारी कर्मचारी नसून खासगी व्यवस्थापनाचे कर्मचारी आहेत. निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याच्या भावनेतून शिक्षक ते नाकारत नाहीत. याचाच गैरफायदा घेत निवडणूक अधिकारी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरतात. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते.

निवडणुकीच्या दिवसांत दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा सुरू असतात. प्रात्यक्षिक परीक्षांसाठीही शिक्षकांची आवश्‍यकता असते. त्यामुळे खासगी शाळांतील शिक्षकांना निवडणुकीतून वगळावे, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देऊन शाळेतील काही कर्मचारीच या कामासाठी घेतले जातील व कुणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्‍वासन सहारिया यांनी दिले.

Web Title: teacher eelection work