भाषा संगमात शिक्षकांची होतेय घुसमट! 

भाषा संगमात शिक्षकांची होतेय घुसमट! 

ठाणे - ठाण्यातील एका नामांकित शाळेतील शिक्षिकांना भेटणं झालं, तेव्हा चक्क त्या काश्‍मिरी भाषेतील वाक्‍यं पाठ करत बसल्या होत्या. आश्‍चर्याने विचारलंच, आपल्याकडे कधीपासून काश्‍मिरी शिकवायला लागले? तेव्हा कळलं, की त्या रोज वेगवेगळ्या भाषेतली पाच-पाच वाक्‍य पाठ करताहेत आणि यामुळे साऱ्या भाषांचा त्यांच्या डोक्‍यात संगम झालाय...! चौकशी केल्यावर कळलं, की हा भाषासंगम उपक्रमाचा परिणाम आहे! अनेक शाळांमधील शिक्षकांना या संगमात डुंबावे(च) लागल्याने त्यांची घुसमट झाल्यासारखी परिस्थिती आहे... 

खरं तर हा उपक्रम आहे उत्तम. देशातील बावीस भाषांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, या हेतूने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा. "एक भारत, श्रेष्ठ भारत' या मोहिमेंतर्गत 20 नोव्हेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हा भाषासंगम उपक्रम राबवण्याची योजना आहे. देशातील भाषाभगिनींचा एकमेकींशी परिचय व्हावा यासाठी आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्‍मिरी, कोंकणी, मैथली, मल्ल्याळम, मणीपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथली, सिंधी, तमीळ, तेलुगु, उर्दू या 22 भाषा प्रत्येक दिवशी प्रार्थनेच्या तासाला शाळेकडून विद्यार्थ्यांना शिकविल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. काही शाळांनी हा उपक्रम सुरू केला असला तरी अनेक शाळा या संगमापासून दूरदूरच आहेत. त्यांना या उपक्रमाची कल्पनाच नाही. दुसरीकडे ज्या शाळांत हा उपक्रम सुरू आहे, तेथील शिक्षकही रोज वेगळ्या भाषेतील पाच वाक्‍यं पाठ करता करता हैराण झाली आहेत. आपल्यालाच पाठ न होणारी, नीट उच्चारता न येणारी ही वाक्‍यं मुलांकडून कशी म्हणून घ्यायची, या पेचात ते आहेत. शाळकरी वयात कोणतीही भाषा शिकणे सहज होऊ शकते, या गृहीतकावर हा उपक्रम आधारित असल्याचे बोलले जाते. पण काही शिक्षकांच्या मते यामुळे एक ना धड, भाराभर चिंध्या अशी परिस्थिती होण्याचीही शक्‍यता आहे. शिवाय काही शाळांमध्येच हा संगम आणि इतर शाळांना त्याची माहितीही नसल्याने हा उपक्रम यशस्वी ठरणार तरी कसा, असाही काहींचा सवाल आहे. 

या उपक्रमांतर्गत मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून रोज एका भाषेतील वाक्‍ये ट्विटर, फेसबुक आणि मनुष्यबळ विकासच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येतात. ही वाक्‍ये पाहून शिक्षकांना ती प्रार्थनेच्या वेळी विद्यार्थ्यांकडून बोलून आणि लिहून घ्यावी लागत आहेत. मात्र काही भाषांचे उच्चारण इतके कठीण आहे, की ते शिक्षकांनाही उच्चारता येत नाही. जर शिक्षकांची अशी स्थिती असेल, तर विद्यार्थ्यांना ते कसे जमेल आणि ते हा उपक्रम किती मनावर घेतील, असा प्रश्न पडल्याचे एका शाळेतील शिक्षकाने सांगितले. या उत्तम उपक्रमाची सरकारी पद्धतीने "राबवणूक' झाली तर त्यातून अपेक्षित ते साध्य कसं काय करता येईल, असाही त्यांचा प्रश्‍न होता. 

काय आहे कार्यक्रम? 
मनुष्यबळ विकास विभाग 20 नोव्हेंबरपासून 21 डिसेंबरपर्यंत ठरलेल्या वेळापत्रकानुसार दररोज सकाळी एकेका भाषेची पाच वाक्‍ये प्रसारित करीत आहे. उदा. आज गुजराती; तर उद्या आसामी. ही प्रसारित झालेली वाक्‍यं शिक्षकाने त्या दिवशी प्रार्थनेच्या वेळात विद्यार्थांसमोर म्हणायची आहे. या वाक्‍यात 'नमस्कार, तुझे नाव काय, माझे नाव..... असे आहे, तुम्ही कसे आहात, मी ठीक आहे' अशी ही पाच वाक्‍ये आहेत. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी ही वाक्‍ये विद्यार्थ्यांनी लिहून आणायची आहेत. तसेच वाक्‍यांसाठी फलकही तयार करायचे आहेत. शिवाय संबंधित शिक्षकाला त्या कार्यक्रमाचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करून तयार करून ती चित्रफीत यूृ-ट्युब या माध्यमावर अपलोड करायची आहेत. आधीच इतर शिक्षणेतर कामांचा बोजा वाढलेला असताना त्यात हे नवे कामही वाढल्याने शिक्षक मात्र वैतागले आहेत. 

केंद्र सरकारचा हा उपक्रम खूप चांगला आहे. आमच्या शाळेत आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र उपक्रम राबविण्यापूर्वी त्यांनी शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण किंवा त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करणे अपेक्षित होते. शिक्षकांना आधीच इतर कामाचा भार आहे. त्यात हे काम आल्याने त्याचा या शिक्षकांना त्रास होत आहे. 
- सुरेंद्र दिघे, सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेचे विश्वस्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com