शिक्षकांच्या प्रयत्नाने दप्तर झाले हलके

संजय शिंदे 
शुक्रवार, 6 जुलै 2018

धारावी - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी धारावीतील दोन शाळांनी आगळावेगळा प्रयत्न केला आहे. जेमतेम एक किलोचा भार विद्यार्थ्यांच्या पाठीवर राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्वच शाळांत अनुकरण करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. 

धारावी - विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी धारावीतील दोन शाळांनी आगळावेगळा प्रयत्न केला आहे. जेमतेम एक किलोचा भार विद्यार्थ्यांच्या पाठीवर राहील याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यांच्या प्रयत्नांचे सर्वच शाळांत अनुकरण करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. 

महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात दोन विषयांसाठी एकच १०० पानी वही आणली जाते. मुले पुस्तके नेत नाहीत. वाचनालयात शालेय पुस्तके ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी रोज फक्त एक किलोचेच दप्तर घेऊन शाळेत येतात ना, याची खबरदारीही घेतली जाते. कमी वह्यांबाबत आक्षेप घेणाऱ्या पालकांना ओझे कमी करण्याबाबत समजावून सांगतो. अशक्त विद्यार्थ्यांना दप्तरात मोकळी पाण्याची बाटली आणि चित्रकला वही आणण्यास सांगितले जाते. शाळेत दुपारचे जेवण व पाणी उपलब्ध आहे. शाळेत दप्तर समितीही बनविली गेली आहे. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाचे शिक्षक समितीचे सदस्य आहेत. अनावश्‍यक वह्या-पुस्तके विद्यार्थ्यांनी आणली नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी  शिक्षक  दप्तर तपासतात. अनावश्‍यक  साहित्य आणले असेल तर शाळेत काढून ठेवले जाते. त्याची माहिती पालकांना देऊन पुन्हा असे घडू नये याची समज दिली जाते, अशी माहिती शिक्षिका संगीता वावेकर यांनी दिली. विद्यार्थ्यांना व पालकांना शिस्त लागली आहे. सुरुवातीला विरोध झाला; मात्र काही महिन्यांतच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्वांची साथ मिळत आहे.

सुरुवातीला पालक व विद्यार्थी सकारात्मक नसल्यामुळे त्यांची बैठक घेऊन त्यांना व्यवस्थित माहिती देण्यात आली. त्यामुळे आता सर्वांची मनोभूमिका बदलली आहे.
- शिवाजी शिंदे, शिक्षक, श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल

व्हॉट्‌सॲपचा प्रयोग करणार 
शाळेत वाचनालयात पाठ्यपुस्तके व अवांतर वाचनाची पुस्तके आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येताना हलके दप्तर पाठीवर असते. निबंध आणि तासिकेच्या वह्या शाळेतच ठेवल्या जातात. त्यांचा अभ्यास मोकळ्या तासिकेत विद्यार्थी पूर्ण करतात. यंदाच्या वर्षीपासून ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल सेवा असेल त्यांना निबंध व्हॉट्‌सॲप करण्यास सांगण्याचा आम्ही प्रयोग करणार आहोत, असे छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वीणा दोनवलकर यांनी सांगितले.

दोन तास एक विषय
‘संत कक्कया विकास संस्था’ संचालित श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूलमध्येही दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. एकाच दिवशी आठ विषयांच्या आठ तासिका घेण्याऐवजी रोज फक्त चार विषयांच्या प्रत्येकी दोन तासिका घेतल्या जातात. त्यामुळे वह्या आणि पुस्तक यांची संख्या निम्मी कमी झाली.  

   शाळा     विद्यार्थी    दप्तराचे वजन 
 श्री गणेश विद्या मंदिर    ८०० विद्यार्थी    २ किलो
 छत्रपती शिवाजी विद्यालय    ८९९ विद्यार्थी    १ किलो

Web Title: Teacher's efforts lightweight bag