World Cup 2019 : वर्ल्डकपसाठी 'टीम इंडिया'च फेव्हरेट! उपांत्य फेरीतील सामन्यांवर 20 हजार कोटींचा सट्टा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेत चांगल्या 'फॉर्मात' असलेल्या भारतीय संघ पहिल्या उपांत्य फेरीचा सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे.

वर्ल्ड कप 2019 : मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरी सामन्यासाठी भारतीय संघ 'फेव्हरेट' असल्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना हा अटीतटीचा होणार असल्याचा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. या सामन्यांवर 20 हजार कोटींचा सट्टा लागल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत चांगल्या 'फॉर्मात' असलेल्या भारतीय संघ पहिल्या उपांत्य फेरीचा सामन्यात भारत न्यूझीलंडवर मात करेल, असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. सट्टेबाजांनी भारतीय संघाला एक रुपये 32 पैशांचा भाव दिला आहे, तर न्यूझीलंडला तीन रुपये 35 पैशांचा भाव देण्यात आला आहे. दोनही संघांचा यापूर्वीचा सामाना पावसामुळे रद्द झाला होता. तर सराव सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने भारताला हरवले होते. 
विश्‍वकरंडक सामन्यातील दुसरा सामना हा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये होणार असून हा सामना अटीतटीचा होण्याची अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला आहे. या समान्यासाठी इंग्लंडवर काहीसे झुकते माप देण्यात आले असून ऑस्ट्रेलियाला दोन रुपये 10 पैशांचा भाव देण्यात आला आहे, तर इंग्लंडला एक रुपये 74 पैशांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या स्पर्धेत बांग्लादेशचा शाकिब अल हसन, भारताचा रोहित शर्मा व ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर आघाडीवर आहेत. 

रोहित व कोहलीच्या शतकावरही सट्टा 
विश्‍वकरंडक स्पर्धेत चांगला सूर गवसलेला रोहित शर्मा आणखी एक शतक ठोकेल, यावरही सट्टा लागला आहे. शर्माच्या शतकावर 50 पैशांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा कोहली अद्याप एकही शतक झळकवू शकला नाही. त्यामुळे त्याच्या शतकावरही सट्टा लागला आहे. याशिवाय न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट व भारताचा जसप्रीत बुमरा या दोघे सामन्यात सर्वाधिक बळी घेतील, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team India favored for World Cup Rs 20000 crore deal for the semi finals