तेजस्विनी महिला बसचा निधी धूळ खात 

File Photo
File Photo


कल्याण : केडीएमटीच्या ताफ्यात महिला स्पेशल बस खरेदीसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी १ कोटी २० लाखाचा निधी दिला होता; मात्र दोन वर्षे बसेस खरेदी न केल्याने तो निधी पालिकेच्या तिजोरीत धूळ खात पडला आहे. आता तो निधी परत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई आणि परिसरात नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असून त्यांना घरातून रेल्वेस्थानक सुरक्षित गाठता यावे, या संकल्पनेतून तेजस्विनी महिला स्पेशल बस संकल्पना पुढे आली.

राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी ३०० तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येणार आहेत. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली होती. त्या निधीमधून केडीएमटीला दोन वर्षांपूर्वी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी पाठवण्यात आला होता.

त्यात ४ बस खरेदी करण्याबाबत केडीएमटी प्रशासनाने पाच ते सहा वेळी निविदा काढली होती; मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने दिलेला निधी पालिकेच्या तिजोरीत धूळ खात पडला आहे. बस खरेदी न झाल्याने तो निधी परत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महिला स्पेशल बसचे कल्याण डोंबिवलीमधील महिलांचे स्वप्न भंगण्याची शक्‍यता आहे.

...तर प्रतिसाद मिळेल
निविदा काढूनही प्रतिसाद न मिळाल्याने राज्य शासनाच्या जीईएम पोर्टलवर केडीएमटी प्रशासनाने निविदा जाहीर केल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो; मात्र केडीएमटी प्रशासन आणि समिती सदस्य हा धाडसी निर्णय घेतील का, याकडे लक्ष्य सर्वांचे लागले आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निधीमधून बस खरेदीबाबत निविदा ५ वेळा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही. कालावधी संपुष्टात आल्याने निधी परत जाण्याची शक्‍यता आहे; मात्र आम्ही या निधीचा वापर करण्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू असून यावर लवकर तोडगा काढू.
- मारुती खोडके,
केडीएमटी व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com