नवी मुंबईकरांच्या अंगाची काहिली

नवी मुंबईकरांच्या अंगाची काहिली

नवी मुंबई - सूर्याच्या वाढत्या प्रकोपामुळे नवी मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत असल्याने विजेचा वापर वाढल्याची नोंद नवी मुंबई केंद्रात झाली आहे. एरवी सामान्य वातावरणात नवी मुंबईच्या ग्राहकांकडून ३०० ते ३५० दशलक्ष युनिट वीजवापर होतो; परंतु गेले दोन महिने उकाडा वाढल्यापासून तब्बल एप्रिल महिन्यात ५५९ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाल्याची नोंद नवी मुंबई केंद्रात झाली आहे; तर मे महिन्यात हा वापर आणखी वाढणार असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.

भांडुप वीज केंद्रांतर्गत वाशी वीज सर्कलचे कामकाज चालते. यात नवी मुंबई शहरासह अगदी पनवेल-उरण तालुक्‍यांमधील ग्राहकांचा समावेश होतो. या परिसरात महावितरणचे तब्बल नऊ लाख ग्राहक आहेत. यात औद्योगिक, वाणिज्यिक, व्यावसायिक आणि रहिवासी ग्राहकांचा समावेश होतो. या भागांमधील ग्राहकांना भांडुप येथील केंद्रांमधून वीज पुरवली जाते. नवी मुंबईच्या ग्राहकांकडून सामान्य वातावरण असताना सरासरी ३५० दशलक्ष युनिट विजेचा वापर केला जातो; परंतु गेल्या दोन महिन्यांत उकाडा वाढत असल्याने शहराचे तापमान अगदी ३८ अंशांवरून ४० अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे घामाने अंग अक्षरशः भिजून निघत असल्याने घरात पंखा, कुलर आणि एसीचा वापर वाढला आहे. रात्री झोपण्यापुरता वापरला जाणारा एसी आता दिवसाही वापरला जात आहे. ज्या ग्राहकांकडे कुलर अथवा एसी नाही, असे ग्राहक तर २४ तास पंख्याची हवा खात आहेत. त्यामुळे वीजवापर वाढल्याने तब्बल ४२५ दशलक्ष युनिट वीज नवी मुंबईकरांनी वापरल्याची नोंद महावितरणकडे झाली आहे. विशेष म्हणजे ग्राहकांकडून विजेचा वापर वाढल्यानंतरही तेवढी वीज अखंडित पुरवण्यात महावितरणला यश आले आहे. नवी मुंबई-वाशी सर्कल महामंडळाकडे वीज उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक वीज वाणिज्य व औद्योगिक विभागात वापरली जात आहे. उर्वरित रहिवासी आणि लहान व्यावसायिकांमध्ये वापरली जात आहे. चंद्रपूर, भुसावळ व नाशिक येथील ट्रान्समिशनकडून नवी मुंबईकरिता वीज येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com