नालासोपारा : बहुजन विकास आघाडी-शिवसेनेमध्ये राडा; रात्रीपासून तणाव (Video)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

वसईच्या सनसिटी परिसरात प्रदीप शर्मा यांनी भाड्याने घेतलेल्या बंगल्यातून पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप करत याठिकाणी बविआचे कार्यकर्ते मुख्य रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे सनसिटी परिसराला एका पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.

नालासोपारा : प्रचार संपताच नालासोपारा विधानसभेत बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली आहे. शनिवारी (ता.19) रात्री 10 च्या सुमारास प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या संशयावरून बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शर्मा यांच्या गाड्या अडवून, त्या तपासण्याची मागणी केली.

संतप्त कार्यकर्त्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला आहे. रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत पूर्ण मतदारसंघात तणावपूर्ण शांतता होती. याबाबत बविआ आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

- आचारसंहितेमुळे शेतकरी वाऱ्यावर; कापलेली पिके हातातून गेली

शिवसेना-भाजप युतीचे नालासोपाऱ्यातील उमेदवार प्रदीप शर्मा हे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास प्रचार संपल्यानंतर नालासोपारा पूर्व निळेमोरे गाव येथे गेले होते. शर्मा हे पैसे वाटप करण्यासाठी आले आहेत. यावरुन बहुजन विकास आघाडीच्या पाचशेच्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांना घेराव घातला होता.

शर्मा यांच्या सर्व गाड्या तपासाव्यात अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. यावेळी शिवसेना-बविआ कार्यकर्ते आणि पोलिसात धक्काबुकीही झाली आहे. बविआचे सर्व कार्यकर्ते संतप्त झाले होते. शेवटी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेऊन शिवसेनेच्या शर्मा यांना त्याठिकाणाहून बाजूला नेले. यावेळी काहीअंशी दगडफेकही झाली. 

- जेलमधील आमदार कदमांना पोलिस घेऊन गेले फ्लॅटवर; वाचा पुढे काय घडले

वसईच्या सनसिटी परिसरात प्रदीप शर्मा यांनी भाड्याने घेतलेल्या बंगल्यातून पैशाचे वाटप होत असल्याचा आरोप करत याठिकाणी बविआचे कार्यकर्ते मुख्य रस्त्यावर जमा झाले होते. त्यामुळे सनसिटी परिसराला एका पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. त्या परिसरातून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येक वाहनांची पोलिसांकडून तपासणी सुरू होती. मतदानाला चोविस तास बाकी असताना नालासोपारा आणि वसई परिसरात मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. 

- केवळ रुग्णवाहिका नसल्याने सिनेअभिनेत्री बाळांतिणीचा बाळासह मृत्यू

प्रदीप शर्मा यांनी बाहेरचे गुंड आणून नालासोपारा मतदार संघात पैसे वाटले, या गुंडाकडून स्थानिक लोकांना मारहाण केली, जे गुंड शर्मांसोबत फिरत आहेत, ते हत्या, ड्रग्ज यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत अटक झालेले, तर काही गुन्हे दाखल झालेले आरोपी आहेत.

मतदानाच्या दिवशी जाणूनबुजून कायदा-सुव्यवस्थेची पायमल्ली करणे, मतदारांमध्ये भीती निर्माण करणे, हे सर्व प्रकार घडविण्याचे षड्यंत्र आहे. आणि याला नालासोपारा, वालीव, विरार पोलिस ही मदत करत आहेत. त्यामुळे या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षीतिज ठाकूर यांनी रविवारी (ता.20) पत्रकार परिषदेत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension in Nalasopara due to the uproar among the Bahujan Vikas Aaghadi and Shiv Sena workers