तारापूरमध्ये हुतात्म्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

समाजमाध्यमांवर हुतात्मा जवानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तारापूर येथे आज तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित पोस्टमधील व्हिडीओ व्हायरल होताच बोईसर-तारापूर परिसरातील तरुणांचा जमाव रस्त्यावर जमा झाला.

 बोईसर : समाजमाध्यमांवर हुतात्मा जवानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तारापूर येथे आज तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित पोस्टमधील व्हिडीओ व्हायरल होताच बोईसर-तारापूर परिसरातील तरुणांचा जमाव रस्त्यावर जमा झाला. घटनास्थळी पोलिस उपस्थित असूनही तरुणांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. वादग्रस्त पोस्ट टाकणारास अटक करण्यात आली आहे. 

जवानांविरोधात वादग्रस्त पोस्ट टाकणारा रिक्षाचालक नदीम यास अटक करण्यात आली असून बोईसर पोलिस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे. भारतीय सैनिकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणारा रिक्षाचालक तारापूरचा रहिवासी आहे. यासंदर्भात तणावाची परिस्थिती लक्षात घेता तारापूरच्या सर्वधर्मीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यासंदर्भात सर्वांनी निवेदन दिले.

या वेळी मुस्लिम समाजाचे नेते व तारापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच वसीम पुनावाला, तारापूर तंटामुक्ती अध्यक्ष सलीम गवंडी, पंचायत समिती सदस्य राजू कुटे, शिवसेनेचे गणेश दवणे, बजरंग दलाचे भावेश मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Web Title: Tensions due to objectionable posts against martyrs in Tarapur