नववीतील अनुत्तीर्णांना दहावीची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई - दहावी-बारावीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी मागील दोन वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेच्या धर्तीवर आता नववीच्या विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. मात्र ही परीक्षा राज्य शिक्षण मंडळाऐवजी शाळास्तरावर घेण्यात येणार असल्याने ती वादात सापडण्याची अधिक शक्‍यता आहे.

शालेय शिक्षण विभागाने नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या वर्गात खेचून आणण्यासाठी या फेरपरीक्षेचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित आदी शाळांमध्ये नववीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे, याची कबुलीच शालेय शिक्षण विभागाने या निर्णयाच्या माध्यमातून दिली आहे. या फेरपरीक्षेची अंमलबजावणी ही पुढील शैक्षणिक वर्षांच्या जून महिन्यात होणार असली, तरी त्यासाठीची तयारी मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षात केली जाणार आहे.

नववीच्या वर्गात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी त्यांच्या गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयासाठी नैदानिक चाचण्याही घेतल्या जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: tenth chance for ninth failed student