समाजमाध्यमावर दहशतवादी हल्ल्याचा संदेश! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

घटनेतील संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. सध्या कोणताही अनुचित प्रकार या परिसरात झालेला नाही.

मुंबई : नालासोपाऱ्यात दहशतवादी कृत्य होणार असल्याचा संदेश समाज माध्यमांवर गुरुवारी व्हायरल झाल्याने नागरिकांसह संपूर्ण पालघर पोलिस दलात खळबळ उडाली होती. नालासोपारा पूर्व येथील राधानगर आणि प्रगतीनगर ही दोन ठिकाणे दहशतवादी कृत्यासाठी निवडल्याचे या संदेशात सांगण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ सतर्कता दाखवित दोन्ही नगरांमध्ये सतर्कतेचा इशारा देवून, व्हायरल झालेल्या संदेशात देण्यात आलेल्या पाच संशयितांना मोठ्या कौशल्याने ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे. 

संदेश खरा होता, की खोडसाळपणाने व्हायरल केला होता, हे मात्र आता पालघर पोलिसांच्या पूर्ण चौकशीनंतरच समोर येणार आहे.

ओसवाल नगर येथील राहणारे दिवाकर शुक्‍ला यांच्या मोबाईलवर नालासोपाऱ्यातील राधानगर या परिसरात दहशतवादी कृत्य होणार असल्याचा व्हॉट्‌सॲप संदेश आला होता. शुक्‍ला यांनी तत्काळ जागरुकता दाखवत पोलिसांना सतर्क केले.

या घटनेतील संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. सध्या कोणताही अनुचित प्रकार या परिसरात झालेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, जर काही संशायस्पद वस्तू किंवा घटना समजल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- डी. एस. पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, तुळींज पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terrorist attack message on mumbai