बोर्डी (जि. पालघर) - डहाणूतील चिखले गावात काही अतिरेक्यांनी शस्त्रसाठ्यासह घुसखोरी केल्याप्रकरणी सोमवारी (ता. 8) रात्रीपासून सुरू करण्यात आलेली शोधमोहीम मंगळवारी (ता. 9) दिवसभर सुरू होती. ग्रामस्थांच्या मदतीने पालघर पोलिस, रॅपिड ऍक्शन फोर्स, तटरक्षक दल आदी तपास यंत्रणांकडून दिवसभर अतिरेक्यांचा शोध सुरू होता.
प्रत्यक्षदर्शी योगेश राऊत यांनी मंगळवारी सकाळी घोलवड पोलिस ठाण्यात हजर राहून सोमवारी रात्री घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. चिखले येथील अच्युतराव पटवर्धन यांना वन क्षेत्राच्या भागात समुद्रकिनाऱ्यावर काही संशयित व्यक्तींची हालचाल दिसली. त्यांपैकी एका व्यक्तीच्या अंगावरील चादर खाली पडताच त्याच्या खांद्यावर स्टेनगनसारखी दिसणारी बंदूक होती. त्या माणसाचा आपण चेहराही पाहिला आहे, असे प्रत्यक्षदर्शींच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याने तपास यंत्रणांनी शोधमोहिमेला गती दिली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स, पालघर पोलिस, सागर, ग्राम रक्षकदलाच्या मदतीने चिखले, वडकतीपाडा, खाडीपाडा, भाईपाडा, आंबावाडी आदी परिसर पिंजून काढण्यात आला. बंद घरे, वाड्या, घनदाट जंगल असलेला भाग, हॉटेल, रिसॉर्ट आदींमध्येही शोधमोहीम राबविण्यात आली.
|