ठाकरे सरकारमधील मंत्री अचानक कोरोना पॉझिटिव्ह कसे?,संदीप देशपांडेंचा खोचक सवाल

पूजा विचारे
Monday, 22 February 2021

महाविकास आघाडी सरकारमधल्या अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. यावरुनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलेलं दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारमधल्या अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. १० राज्यमंत्र्यांपैकी ७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ४३ पैकी २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावरुनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात?, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 

सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात असल्याचा आरोपही देशपांडेंनी केला. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर आरोप केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे. 

मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का? तुम्हाला घरी बसायचं आहे तर बसा पण लोकांना लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Thackeray Government minister corona positive mns sandeep deshpande criticizes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray Government minister corona positive mns sandeep deshpande criticizes