ठाण्याला पुन्हा कोंडीचे ग्रहण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

एक वर्षापूर्वी मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना ठाणे शहरासह भिवंडी, डोंबिवली, नवी मुंबईला वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा बायपासच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. मुळात एका वर्षात या बायपासची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आल्याने यापूर्वीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

ठाणे : एक वर्षापूर्वी मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना ठाणे शहरासह भिवंडी, डोंबिवली, नवी मुंबईला वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. आता पुन्हा एकदा बायपासच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. मुळात एका वर्षात या बायपासची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ आल्याने यापूर्वीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मुंब्रा बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. मात्र, राज्यात सरकार स्थापन न झाल्याने शपथविधी होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा नव्याने सुरू झाल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी किमान चार महिने लागण्याचा अंदाज आहे. एक वर्षापूर्वीही अशाचप्रकारे दोन महिने काम सुरू राहणार असल्याचे सांगून तब्बल सहा महिने हे काम सुरूच राहिले. त्यामुळे ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची बजबजपुरी माजली होती. 

मुंब्रा बायपासचे काम सुरू झाल्यानंतर ठाणे शहरासह मुलुंड, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, भिवंडी आणि नाशिक महामार्गाला या वाहतूक कोंडीचा जोरदार फटका बसतो. त्यातही या काळात टोलनाक्‍यावरील वाहतूक कोंडी; तर मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत असते. मुंब्रा बायपास मार्गावरून अवजड वाहने भिवंडीतील गोदामे तसेच उरण जेएनपीटीच्या दिशेने जात असतात. या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शहराच्या बाहेरून जाणारी हजारो वाहने ठराविक वेळेत कोणत्या मार्गाने वळवायची, हा प्रश्‍न वाहतूक पोलिसांसमोर असतो. 

अधिक कालावधी लागणार? 
मुंब्रा बायपास येथील टोलनाक्‍याला स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्याची दखल घेऊन येथील टोलचा ठेका रद्द करण्यात आला. टोल कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर या रस्त्याची दुर्दशा झाली होती. अखेर मे 2018 मध्ये या मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी केवळ सहाशे मीटर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्याचा कालावधी लागला होता. आता एक हजार मीटर रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या कामाला अधिक कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. 

मध्य रेल्वेलाही फटका 
मुंब्रा बायपासची दुरुस्ती होणार असलेल्या एक हजार मीटरच्या रस्त्याखालून मध्य रेल्वेच्या धीम्या गतीचा रेल्वे मार्ग जातो. अशावेळी या रेल्वे रुळावरील रस्त्याचे काम करताना वाढीव मेगा ब्लॉक घ्यावा लागतो. असा मेगा ब्लॉक वारंवार घ्यावा लागणार असल्याने या काळात धीम्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फटका बसणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane again receives the traffic Jam