ठाण्यातील आघाडीत बिघाडी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

ठाणे - ठाण्यातील राष्ट्रवादीचे आणि मुंबईतील कॉंग्रेसचे नेते आघाडीबाबत सकारात्मक असूनही शहर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मात्र आघाडीची कोणत्याही क्षणी बिघाडी होण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे; तर राष्ट्रवादीने कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आघाडीबाबत सकारात्मक असल्याने आघाडी होणारच, असे सांगितले आहे. आघाडीबाबतचा विषय वारंवार प्रसारमाध्यमातून चर्चेला आणण्याच्या ऐवजी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वरिष्ठांबरोबर संवाद साधल्यास अधिक सयुक्तिक ठरेल, असा टोलाही स्थानिक कॉंग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादीने लगावला आहे. 

एकीकडे मुंबईत कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आघाडी झाल्याची घोषणा केली असली, तरीदेखील, ठाण्यातील आघाडीचे घोडे अद्याप आठ जागांच्या देवाण-घेवाणीवरून अडले आहे. या जागांवर तोडगा काढण्यासाठी बैठक होऊनही कॉंग्रेसने या आठ जागांवर आपला दावा अद्याप कायम ठेवल्याने आघाडीत बिघाडी होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून केवळ निवडणुकीपुरता कॉंग्रेसचा वापर करण्यात येत असल्यानेच जागावाटपाबाबत तडजोड न करण्याची भूमिका कॉंग्रेसच्या एका गटाने घेतली आहे. तर केवळ एका नेत्यासाठी संपूर्ण आघाडीचे भवितव्य टांगणीला लावण्यास कॉंग्रेसमधीलच एका गटाचा विरोध असल्याची चर्चा आहे. 

गरजेपुरता कॉंग्रेसचा आधार 
ठाणे पालिकेच्या निवडणुकीत आघाडीचा निर्णय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यानुसार 21 तारखेला मुंबईत झालेल्या बैठकीतही कॉंग्रेसतर्फे राणे यांनी आघाडी झाल्याची घोषणा केली. परंतु असे असतानादेखील आठ जागांवरून कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद कायम असल्याचे कळते. वादग्रस्त आठ जागांचा मुद्दा निकाली काढण्यासाठी ठाण्यातही पुन्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. कॉंग्रेसने मुंब्रा, गोकुळनगर, घोडबंदर, बाळकुम, वागळे या जागांवर आपला दावा कायम ठेवला आहे. परंतु राष्ट्रवादीदेखील या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे आता या आठ जागांवरून आघाडीची बोलणी फिस्कटणार की पुढे जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आपल्याला वापरून घेत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी केला आहे. 

आश्‍वासने न पाळल्याने नाराजी 
गेल्या पालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एक वर्ष विरोधी पक्षनेतेपद, स्थायी समिती, प्रभाग समिती आदींसह इतर महत्त्वाची पदे देण्याचा करारनामा झाला होता; परंतु यातील कोणतेही आश्वासन राष्ट्रवादीने पाळले नसल्याने कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळेच कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून बिघाडीचा इशारा दिला जात आहे; तर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना ठाण्यातील परिस्थितीची कल्पना असल्याने त्यांच्याकडून योग्य निर्णय घेतला जाईल, अशा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त होत आहे. 

Web Title: Thane alliance failed?