ठाणे-बेलापूर रस्ता अंधारात

ठाणे-बेलापूर मार्गावर अंधार पसरला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर अंधार पसरला आहे.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते रबाळे दरम्यान मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटच्या रोषणाईवर वाहने चालवावी लागत आहेत; तर या अंधारामुळे पादचाऱ्यांची रस्त्यावरून जाताना मोठी गैरसोय होत आहे. रबाळे विभागात महावितरणचे विद्युत जनित्र नसल्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे पालिकेच्या अभियंता विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे व नवी मुंबईला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने ठाणे-बेलापूर रस्त्यावरून रोज हजारो वाहनचालक प्रवास करतात. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे एमएमआरडीएने घणसोली येथे उड्डाणपूल बांधला आहे; तर नवी मुंबई महापालिकेनेदेखील रबाले येथे भुयारी मार्गाचे काम सुरू केले आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यालगतच दिघापासून ते घणसोलीपर्यंत रस्त्याच्या कडेला आयटी पार्क कंपन्यांसह रिलायन्स समूहाची कंपनी आहे. या रस्त्याच्या कडेला पालिकेने पथदिवे बसवलेले आहेत; तर घणसोली उड्डाणपुलाच्या १.४ किलोमीटरच्या प्रवासासाठी रस्त्याच्या बाजूने उंच असे हायमास्ट बसवले आहेत; मात्र या रस्त्यावरील पथदिवे काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटस्‌वर वाहने चालवावी लागतात; मात्र रात्री उशिरा एमआयडीसीमधून कामावरून सुटणाऱ्या नागरिकांना अंधाराचे साम्राज्य पसरत असल्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

रबाळे विभागात महावितरणचे विद्युत जनित्र नसल्यामुळे या ठिकाणाचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी विद्युत जनित्र बसवून देण्यात यावे, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे.
- प्रवीण गाडे, कार्यकारी अभियंता, महापालिका.

रबाळे येथे विद्युत जनित्र बसवण्यात येणार आहे. महापालिकेकडूनदेखील तशी मागणी करण्यात आली आहे.
- सुरेश जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com