ठाणे-बेलापूरवरील कोंडी फुटणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. एमएमआरडीएतर्फे (मुंबई महानगर विकास प्राधिकरण) या मार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा वेग वाढणार आहे. 

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. एमएमआरडीएतर्फे (मुंबई महानगर विकास प्राधिकरण) या मार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपूल व एका ठिकाणी सुरू असलेल्या भुयारी मार्गाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात त्यांचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा वेग वाढणार आहे. 

नवी मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर रस्त्याच्या रुंदीकरण व दुरुस्तीला महापालिकेने 2006 मध्ये सुरुवात केली होती. 2008 मध्ये ते काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. तेव्हा या रस्त्यावरून दिवसाला 25 हजार वाहने धावत होती; मात्र कालांतराने शेजारच्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग-धंदे वाढल्यामुळे आज सुमारे एक लाख वाहनांची दररोज ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गावर तुर्भे, घणसोली, ऐरोली व दिघा येथे रोज वाहतूक कोंडी होत होती. या मार्गाच्या एका बाजूला नागरी वस्ती तर दुसऱ्या बाजूला औद्योगिक वसाहत असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने उड्डाणपूल बांधण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार घणसोली-तलवली व सविता केमिकल जंक्‍शन येथे दोन उड्डाणपूल आणि महापेजवळ भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. घणसोलीजवळ सुमारे दीड किलोमीटरचा उड्डाणपूल व सविता केमिकलजवळ 600 मीटरचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे; मात्र महापेजवळ आधीच उड्डाणपूल असल्यामुळे येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 600 मीटरचा भुयारी मार्ग तयार केला आहे. या तिन्ही कामांवर सुमारे 155 कोटी खर्च करण्यात आले आहेत. सध्या 95 टक्के कामे पूर्ण झाली असून, शेवटच्या टप्प्यातील विजेची व रंगरंगोटीची कामे सुरू आहेत, अशी माहिती एमएमआरडीएच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

वाहतुकीमुळे कामाला विलंब 
ठाणे-बेलापूर मार्गावर तीन ठिकाणी काम करण्यासाठी एमएमआरडीएला तब्बल 12 महिन्यांचा विलंब लागला. या मार्गावर मार्च 2015 मध्ये कामाला सुरुवात झाली. ते साधारणपणे 24 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा होती; मात्र कामासाठी वाहतुकीत बदल करण्यास वाहतूक पोलिसांकडून विलंब झाल्याने त्याचा परिणाम प्रकल्पांवर होऊन 12 महिन्यांचा विलंब लागला. महापे पुलाजवळची वाहतूक वळवण्यास सांगितल्यानंतर नोव्हेंबर 2017 ला वाहतूक एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने वळवण्यात आली. 

सरकारकडे मागणी 
दोन उड्डाणपूल व एका भुयारी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाल्याने एमएमआरडीएने उड्डाणपुलांच्या उद्‌घाटनाची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. त्यासाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील तारीख जवळपास निश्‍चित झाली आहे; मात्र त्या तारखेला राज्यातील मंत्र्यांसोबतच केंद्रातील एखादा मंत्री आणण्याचा विचार सुरू असल्यामुळे कार्यक्रमाची तारीख अद्याप घोषित केली नसल्याचे सूत्रांकडून समजले.

Web Title: Thane-Belapur traffic issue slove