...अशी केली आयुक्तांनी ठाण्यात फेरीवाल्यांची सफाई (व्हिडिओ)

thane Commissioner, cleanliness of hawkers
thane Commissioner, cleanliness of hawkers

ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना जबर मारहाण करणाऱ्या गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी (ता. 11) कंबरडे मोडले. या कारवाईचा Exclusive व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फेरीवाल्यांचे 15 ते 20 गाळे जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जमीनदोस्त केले. जमदग्नीचे रूप धारण केलेल्या आयुक्तांनी काल सायंकाळी फेरीवाल्यांच्या तावडीतून ठाणे रेल्वेस्थानक परिसरही मुक्त केला.

आयुक्तांनी गावदेवी, स्थानक परिसर, स्टेशन रोड, जांभळी नाका, तलावपाळी व शिवाजी पथ ते पुन्हा गावदेवी अशी फेरी मारून त्या परिसरातील रिक्षाचालक, बेकायदा पार्किंग करणारे, फेरीवाले यांना दणका दिला. उपायुक्त संदीप माळवी यांना काल फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या पथकाने आज सकाळपासूनच गावदेवी परिसरात ठाण मांडले होते. जेसीबी, बुलडोझर, ट्रक आणि मोठा फौजफाटाही तेथे होता. त्यामुळे गावदेवी परिसर, स्टेशन परिसर व सॅटीसवरील फेरीवाले गायब झाल्याचे दिसत होते.

पालिका आयुक्त संध्याकाळी फेरीवाल्यांचे कंबरडे मोडणार असल्याची चर्चा पसरल्यामुळे गाळेधारक उपस्थित होते. गावदेवी मार्केटचा परिसरातील 15 ते 20 गाळे महापालिकेचे आहेत. सुरुवातीला पालिकेच्या पथकांनी गाळ्यांना सील लावणे, तेथील वस्तू बाहेर काढणे, दुकानांचे बोर्ड काढणे व वाढवलेली अतिक्रमणे काढणे, अशी कारवाई केली. महापालिकेचे हे गाळे असल्यामुळे कारवाई होणार नाही, अशी चर्चा गाळेधारकांमध्ये होती. परंतु, काही वेळात पालिका आयुक्त जयस्वाल पोलिस बंदोबस्तासह तेथे दाखल झाले. त्यांनी गाळ्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिले. सर्वप्रथम उपायुक्त माळवींना मारहाण करणाऱ्या गाळेधारकांचे "एकवीरा पोळीभाजी केंद्र' जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले. नंतर तेथील 15 ते 20 गाळे नष्ट करण्यात आले.

पालिका आयुक्तांनी गाळेधारकांना साहित्यही बाहेर काढण्याची संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी काही जण विरोध करण्यास पुढे येऊ लागले. परंतु पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी बखोट धरून त्यांना बाजूला केले. हमरीतुमरीवर आलेल्या काहींना पोलिसांनी दणका दिला. त्यानंतर पालिका आयुक्तांनी स्थानक परिसराची पाहणी केली. मात्र सकाळपासूनच स्थानक परिसर रिकामा असल्यामुळे त्यांनी तेथून स्टेशन रोड, जांभळी नाका, तलावपाळी आणि तेथून शिवाजी पथावरून पुन्हा गावदेवीकडे फेरी मारून पाहणी केली.

वाहतूक पोलिस नावापुरते
महापालिका आयुक्त, पोलिस अधिकारी व वाहतूक पोलिस अधिकारी स्थानक परिसरात फिरत असताना वाहतूक पोलिसांच्या अपयशाचे दर्शन त्यांना घडले. बसथांब्यांसमोरील वाहनांचे पार्किंग, ठिकठिकाणची वाहतूक कोंडी, रिक्षाचालकांची मुजोरी यांचे दर्शन आयुक्तांना घडले. त्यांनी याविषयी वाहतूक पोलिसांकडे नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या कारवाईमुळे गावदेवी भागातील वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची पुरती दमछाक होत होती.

पदाधिकाऱ्याला मारहाण
पालिका आयुक्त स्थानक परिसरातील सॅटिसखाली पोहचल्यानंतर तेथे रिक्षाचालक संघटनांचे फलक काढून टाकण्यात आले. विरोध करणाऱ्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिस आणि पालिका आयुक्तांच्या अंगरक्षकांनी मारहाण केली. पालिका आयुक्तांनीही त्याला पकडल्यामुळे रिक्षा संघटनांनी बंद पुकारला; परंतु तो फार काळ टिकला नाही.

बेशिस्त तरुणालाही प्रसाद
जांभळी नाका येथे गाडी पार्क करणाऱ्या तरुणालाही पालिका आयुक्तांनी गाडी बाजूला काढण्याची सूचना केली. त्यांना उद्धट उत्तर दिल्याने आयुक्तांनी त्याची कॉलर पकडली. तोही आयुक्तांच्या अंगावर धावून गेला; परंतु पोलिसांनी त्याला रोखले.

'सकाळ'च्या बातमीने...
रस्ते, स्थानक परिसर, गावदेवीचा परिसर व सॅटिस पुलावर फेरीवाल्यांनी आपले साम्राज्य उभारून नागरिकांना वेठीस धरले होते. 'सकाळ'ने वारंवार फेरीवाल्यांच्या या अतिक्रमणांच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. 'सकाळ'च्या 3 मेच्या अंकात "रस्ते फेरीवाल्यांचे' हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने प्रत्येक उपायुक्तांचे पथक नेमून कारवाई सुरू केली होती. पालिका आयुक्तांनी आज या कारवाईचा कळसाध्याय साधला आणि स्थानक परिसराने मोकळा श्‍वास घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com