संभाव्य स्मशानभूमीसाठी कलगीतुरा

संभाव्य स्मशानभूमीसाठी कलगीतुरा

ठाणे - घोडबंदर भागातील निलकंठ सोसायटी परिसरातील स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून शुक्रवारच्या (ता. १३) सर्वसाधारण सभेत चर्चेचा गोंधळ उडाला. मुळात ही स्मशानभूमी होऊ नये, अशी मागणी सर्वात प्रथम भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली असल्याची आठवण भाजपच्या नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेला करून दिली. भाजपच्या आमदारांनी केलेल्या मागणीचाच पाठपुरावा शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के करीत असल्याचा आरोप भाजपने केला; तर म्हस्के यांनी मात्र आपण कोणत्याही श्रेयाच्या वादात पडण्यास इच्छुक नसून या स्मशानभूमीला आपण विरोध केल्यानेच ही स्मशानभूमी थांबवली गेली असल्याचे सांगितले.

मुळात गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर भागातील निलकंठ सोसायटीच्या संभाव्य स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे या स्मशानभूमीच्या बाजूने आहेत; तर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या स्मशानभूमीला विरोध केला आहे. आज अचानक या स्मशानभूमीचा प्रस्ताव याच महासभेत मंजूर झाल्याने तो मंजूर कोणी केला, त्यावर सह्या कोणाच्या आहेत, या स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून महासभा आणि प्रशासनावर आरोप केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेनेसह सभागृह नेते म्हस्के यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुळात सुविधा भूखंडावर स्मशानभूमी उभारता येते, अशी विचारणा करून सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रस्तावावर सह्याच कसे करतात, असा प्रश्‍न त्यांनी केला. या प्रस्तावावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या झाल्या नसत्या, तर भाजपच्या आमदारांना त्याविरोधात उतरण्याची वेळच आली नसती, असा दावा भाजपने केला.

आपण नागरिकांसाठी या विषयात लक्ष घातले असून कोणत्याही श्रेयासाठी आपण त्याचा पाठपुरावा करीत नसल्याचे म्हस्के यांनी सांगितले. या स्मशानभूमीला माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत विरोध कायम राहणार असल्याचेही ते म्हणाले; तर प्रशासनातर्फे शहर विकास अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, सर्वधर्मीयांच्या स्मशानभूमीचा एक ठराव सरकारने मान्य केला आहे. उर्वरित दोन ठराव त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. सुविधा भूखंडावर स्मशानभूमी होऊ शकते की नाही, याबाबत मात्र त्यांनी थेट मतप्रदर्शन केले नाही.

समाजकंटक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप
सर्वसाधारण सभेत स्मशानभूमीचा विषय शिवसेना आणि भाजपमध्ये वादविवादाच्या माध्यमातून गाजत असतानाच, रेप्टाकॉस अथवा मुल्लाबाग येथेच स्मशानभूमी व्हावी, अशी आमच्या समितीची भूमिका मुळीच नाही अथवा यापूर्वीही नव्हती. नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशा कुठल्याही ठिकाणी महापालिकेने स्मशानभूमीसाठी जागा द्यावी; अशी मागणी आम्ही केली होती, अशी माहिती स्मशानभूमी संघर्ष समितीने दिली. काही राजकीय पक्ष आणि विकसकांनी स्वत:ची पोळी भाजण्यासाठी काही आंदोलकांना हाताशी धरून अफवा पसरवण्याचे काम सुरू केले आहे. रेप्टाकॉस, मुल्लाबाग किंवा दोस्ती विहार येथील भूखंडावरच स्मशानभूमी व्हावी, अशी समितीची मागणी नसताना काही समाजकंटक जाणूनबुजून नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करीत आहेत, असा आरोप समितीने केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com