
Crime News : ठाणे हादरले! मोबाईल चोरीपायी धावत्या लोकलमध्ये दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न, गर्दुल्ला फरार
दिवा : कळवा- मुंब्रादरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये दिव्यातील एका दिव्यांग व्यक्तीला गर्दुल्ल्याने जाळण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमीचा डावा हात भाजला असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रमोद वाडेकर (अंदाजे वय 35) असे जखमीचे नाव असून तो जन्मतः मुक बधिर आहे. शनिवारी रात्री तो कामावरुन घरी परतण्यासाठी कांजुरमार्गवरुन कल्याण लोकलमधून प्रवास करत होता. लोकल कळवा- मुंब्रा या स्थानकांदरम्यान येताच मोबाईलसाठी एका गर्दुल्ल्याने त्याच्या सोबत हुज्जत घातली. त्या गर्दुल्ल्याने नशेसाठी वापरला जाणारा थिनर हा द्रव पदार्थ प्रमोदच्या अंगावर फेकून माचीस पेटवून आग लावली. यामध्ये दिव्यांग प्रमोद वाडेकर हा गंभीर जखमी झाला असून त्याचा पूर्णतः डावा हात होरळपला आहे. या घटनेतील संशयीत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पंढरी कांदे यांनी दिली.
कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकात वा रेल्वे पुलावर सर्रास गर्दुल्ले दिसतात. हे गर्दुल्ले पैशांपायी प्रवाशांना त्रास देतात किंवा प्रसंगी धाक दाखवून चोरी करतात. अशांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
प्रवाशाने दाखवले प्रसंगावधान
‘ट्रेनने मुंब्रा सोडल्यावर आग आग अशी महिलांकडून आरोळी ऐकायला आल्यावर मी जेव्हा अपंगाच्या डब्ब्यात बघतो तर एका व्यक्तीवर आगीने पेट घेतला होता. त्यात त्याने नायलॉनचे टीशर्ट घातल्याने आग जास्त पेटली. त्यात त्याचा हात व केस जळाले होते’, असे या घटनेचा साक्षीदार संजय रेड्डीने ‘सकाळ’ला सांगितले.
मी लगेच धावून त्याच्या अंगावरील टीशर्ट फाडले. ते जर फाडले नसते तर तो पूर्ण भाजला असता. आग लागली तेव्हा कळल नाही नेमक काय झालं. महिलांनी सांगितलं की मुंब्र्याला उतरलेल्या एका गर्दुल्ल्याने या माणसाच्या अंगावर काही द्रव पदार्थ टाकून माचीसची जळती काडी फेकली, असं रेड्डींचं म्हणणं आहे.
महिला डब्यात पोलीस असता तर...
जर महिला डब्ब्यात पोलीस असता तर तो गर्दुल्ला लगेच पकडला गेला असता. तो गर्दुल्ला पाच फुट दोन इंच उंचीचा असून तो दिव्यांग होता, असे डब्यातील प्रवाशांनी सांगितले.
पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करावा
”गर्दुल्ल्याचा त्रास हा दिवसेंदिवस लोकल गाड्यात तसेच स्थानक परिसरात वाढत चालला आहे. लोहमार्ग पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मुंब्रा रेल्वे स्थानक आणि परिसरात प्रवाशांवर दगडफेक, चालत्या गाडीत प्रवाशांच्या हातावर मारणे, गर्दुल्ल्यांचा वावर खूप जास्त आहे. सुविधांचा विचार करताना प्रवाशांच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार केला पाहिजे.”
- अँड.आदेश भगत अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना