ठाणे जिल्हा बँकेचे व्यवहार झाले ठप्प; इंटरनेट सेवा कोलमडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

दोन्ही जिल्हयातील आदिवासी दुर्गम भागातील शाखा बंद असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत.  ​

मोखाडा - ठाणे आणि पालघर जिल्हयातील ग्रामीण भागात अग्रगण्य असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवहार, मुख्य कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद पडल्याने, दोन्ही जिल्हयातील आदिवासी दुर्गम भागातील शाखा बंद असल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत.  

या बँकेमार्फत शेतकऱ्यांना पिक कर्ज दिले जाते. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे पगार, निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार योजना, तसेच व्यापारी व छोट्या - मोठ्या कंपन्या यांचे व्यवहार होत आहेत. सध्यस्थितीत खरीप हंगामासाठी पीक कर्ज दिले जात आहे. मोठ्या संख्येने शेतकरी हे कर्ज घेतात. कर्ज घेण्यासाठी आदिवासी भागातील शेतकरी गेली तीन दिवसांपासून भरपावसात बँकेपुढे रांग लाऊन ऊंबरठे झिजवत आहेत. मात्र, इंटरनेट सेवा बंद पडल्याने, सर्व बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे वयोवृद्ध ग्राहक आणि शेतकर्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

याबाबत बँक व्यवस्थापनाला विचारले असता, बँकेच्या मुख्य शाखेतील सर्वर डाऊन झाल्याने सर्व शाखांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तेथील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. लवकरच व्यवहार सुरू होतील असे सांगितले आहे. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Thane district bank has closed the functioning because Internet service is closed