ठाणे जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर रखडले!

शर्मिला वाळुंज
बुधवार, 31 जुलै 2019

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाचे स्थलांतर पर्यायी जागेत होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, जूननंतर जुलै महिनाही संपत आला तरी रुग्णालय स्थलांतराच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत.

ठाणे : पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. परंतु प्रशासनाच्याच हलगर्जीपणामुळे आजही धोकादायक इमारतीतच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पावसाचा जोर वाढल्यास कधी कोणते संकट कोसळेल याची भीती येथील रुग्ण व नातेवाईकांना सतावत असून रात्रीच्या प्रहरी नातेवाईक रात्र जागून काढत आहेत.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे. वारंवार विविध विभागातील बांधकामाची पडझड होऊन रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने सरकारने रुग्णालयाचे स्थलांतर ठाणे मनोरुग्णालयाच्या आवारातील इमारतीत करण्यास मान्यता दिली. मनोरुग्णालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाच्या इमारतीत या विभागांचे स्थलांतर होणार आहे. 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाचे स्थलांतर पर्यायी जागेत होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, जूननंतर जुलै महिनाही संपत आला तरी रुग्णालय स्थलांतराच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. जागेचे काम अद्याप पूर्ण झाले नसून ते अंतिम टप्प्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असून, पावसाळा रुग्णांना भीतीच्या छायेतच घालावावा लागणार आहे.

जिल्हा रुग्णालयाचा आमच्यासारख्या रुग्णांना मोठा आधार असतो. परंतु, रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था पाहता कधी कोणती घटना घडेल, अशी भीती सतत असते. 
- रेश्‍मा वायकर, रुग्णाच्या नातेवाईक

रुग्णालयासाठी अत्यावश्‍यक अशा सर्व सोयी सुविधा पर्यायी जागेत उपलब्ध झाल्याशिवाय रुग्णांचे स्थलांतर करता येत नाही. अद्याप त्या ठिकाणी काम बाकी असून काम पूर्ण झाल्यानंतरच स्थलांतर करण्यात येईल.
डॉ. कैलास पवार, 
जिल्हा शल्यचिकित्सक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane District Hospital Migration Stopped!