esakal | ठाण्याला अमली पदार्थांचा विळखा, माफिया रडारवर; महिनाभरात ६८ लाखांचा साठा जप्त | Drugs
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

ठाण्याला अमली पदार्थांचा विळखा, माफिया रडारवर; महिनाभरात ६८ लाखांचा साठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अभिनेता शाहरूख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यनचे ड्रग्ज प्रकरण (drug case) चर्चेत असताना अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत (drug addiction) चाललेल्या ठाण्यातील तरुणाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या २५ दिवसांत पोलिसांनी शहरभर छापा टाकत ६८ लाख सात हजार ४९८ रुपयांचे अमली पदार्थ जप्त (drug seized) केले. यामधील विदेशी बनावटीचे अमली पदार्थ जास्त आहेत. भारतात बंदी असूनही ते पदार्थ कुठून व कसे ठाण्यात येतात, याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. यामागे मोठी आंतरराष्ट्रीय टोळी (international racket) सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा: नवी मुंबई: दिघावासीयांची पाण्याची चिंता मिटणार

शहरातील अनेक पान शॉप, सिगारेट दुकाने येथे अमली पदार्थांची विक्री सर्रास सुरू असल्याचे समजते. १८ वर्षांखालील मुलेही या व्यसनाला बळी पडत असल्याचे समोर आले आहे. अमली पदार्थांतील काही ठराविक पदार्थ माहीत असतात. त्याव्यतिरिक्त व्हाइटनर, रंगात वापरण्याचे थिनर, नेलपेंट रिमुव्हर, बुक, केटामाइन, ग्लूपेंट, ड्रायक्लिनिंग करण्याचे रसायन, वेदनाशामक मलमे, काही प्रकारचे गोंद, हेअर स्प्रे, डिओडरंट, मॅजिक मशरूम या नावाची पावडर शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये नशेसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे. हे रसायन सहज उपलब्ध होत असल्याने याचा विळखा तरुणाईभोवती असल्याचे चित्र आहे. हे पदार्थ प्रतिबंधित घटकांच्या यादीत नसल्याने एनसीबी त्यावर थेट कारवाईही करू शकत नाही.

असा होतो वापर

अमली पदार्थ थेट नाकात किंवा तोंडात उडवणे, बोटाला किंवा शर्टाच्या कॉलरला लावणे, रूमालाला लावून हुंगणे अशाप्रकारे नशा केली जाते. या घटकांमध्ये ब्युटेन, क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या रसायनांचा समावेश असतो. यामुळे थेट मेंदू बधिर होतो. तिची नशा चढते; मात्र दैनंदिन वापरातील या गोष्टींचे व्यसन चटकन लक्षात येत नाही. एकदा या नशेच्या आहारी गेले की, पुन्हा त्यातून बाहेर पडणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विक्रीसाठी शक्कल

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आणि शाळा, महाविद्यालय परिसरात विक्री करण्यासाठी माफियांनी कार्टून स्टिकरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. विशिष्ट प्रकारच्या पारदर्शक पेपरला को लाईक ॲसिडमध्ये भिजवून नंतर त्यास डाईएथाइलामाईंड नावाच्या केमिकलमध्ये कम्पोनेट करून ट्रेनस्परंट फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट केले जातात. या प्रक्रियेनंतर ही पेपरशीट ड्राय करून त्यावर कार्टूनचे स्टिकर लावले जातात. त्यानंतर या पेपरवर पिंक- सुपर मॅन, ब्ल्यू-बॅटमॅन, ब्लॅक-स्पाईडरमॅन अशी विविध कार्टून्स चित्रे लावली जातात. त्यामुळे हे ओळखणे पोलिसांना कठीण जाते. सध्या किरकोळ ड्रग्ज विक्री मार्केटमध्ये आय- २५, प्रमोदम, टपरी अशा विविध कोडवर्डने हे ड्रग्ज संबोधले जातात. एका एलएसडी पेपरची किंमत १६५ डॉलर म्हणजेच सुमारे १२ हजार रुपयांपर्यंत असते. विदेशात या ड्रग्ज प्रकाराने अत्यंत कहर केलेला आहे.

हेही वाचा: नवी मुंबईला डबल ए प्लस स्टेबल मानांकन; सलग सातव्यांदा मानकरी

"सध्या ठाण्याच्या वेगवेगळ्या भागात छापेमारी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. सिगारेट, चरस, गांजा, ड्रग्स यासारखे विदेशी बनावटीचे घातक पदार्थ विदेशातून येत असतात. पोलिसांच्या कारवाईच्या सुटकेपासून अनोखी शक्कल लढवतात. तरीही पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे."
- विजय पोवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक

"ड्रग्जमाफियांकडून तरुणांना टार्गेट केले जाते. अनेक शाळा-महाविद्यालय परिसरामध्ये याची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते. सर्वसामान्य तरुण मौजमजेसाठी सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करतात; मात्र त्यानंतर ते व्यसनाच्या आहारी जातात. सोशल मीडियामुळेही अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जातात. अनेक वेळा पालकांचेही आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होते. त्याचबरोबर किरकोळ मानसिक तणावामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जातात. पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे असते."
- डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचार तज्ज्ञ

loading image
go to top