
ठाणे परिवहन सेवेत अनेक नवीन बसचा समावेश होणार आहे. सध्या परिवहन सेवेत १० नव्या बसचा समावेश झाल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे.
Electric Bus : इलेक्ट्रिक बसमुळे टीएमटीला उभारी
- स्नेहा महाडिक
ठाणे - ठाणेकरांना सुखकर प्रवास देण्याची कसरत करणाऱ्या ठाणे परिवहन सेवेने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्या १० इलेक्ट्रिक बसेसचा समावेश झाला आहे. यामुळे परिहन सेवा अर्थात टीएमटीला नवी उभारी मिळाली आहे. या बसच्या माध्यमातून प्रतिदिन नऊ हजार असे दहा बसचे उत्पन्न प्रतिदिन ९० हजाराने वाढल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली.
ठाणे परिवहन सेवेत अनेक नवीन बसचा समावेश होणार आहे. सध्या परिवहन सेवेत १० नव्या बसचा समावेश झाल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे; तर आणखीन दोन नव्या बस आलेल्या आहेत. त्यांची आरटीओकडे नोंदणी झाल्यानंतर त्या रस्त्यावर धावणार आहेत. ठाण्यात जुलै महिन्याच्या अखेरीस ठाणे परिवहन बसेची संख्या ही ४८७ च्या आसपास जाणार आहे. त्यामुळे परिवहन ठाणेकरांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली. येणाऱ्या काळात परिवहन २५ लाखांपेक्षा जात ठाणेकरांना सुखकर प्रवासाची अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न ४८७ बसच्या दिमतीवर करण्यात येणार आहे.
परिवहनच्या उत्पन्नात मोठी वाढ
ठाणे परिवहनच्या ताफ्यात नव्या बसचा भरणा होणार आहे. आज दहा नव्या इलेक्ट्रिक बसचा सहभाग असला तरीही जुलैअखेरीस तब्बल १२३ बस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. परिवहनचे उत्पन्न २५ ते २६ लाखांच्या आसपास प्रतिदिन होते; तर आता दहा बस वाढल्याने शहरात प्रतिदिन ९० हजारांनी उत्पन्नात वाढ झाली आहे; तर जेव्हा परिवहनच्या ताफ्यात जुलैअखेरीस १२३ नव्या बसेस रस्त्यावर धावतील, तेव्हा किमान ३० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न प्रतिदिन परिवहनचे होईल, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला.
असा होणार नव्या बसचा समावेश
मे महिन्यात परिवहनला ९ मीटरच्या १६ बस, १२ मीटरच्या ९ बस दाखल होणार आहेत; तर जून महिन्यात ४० बस ९ मीटरच्या ताफ्यात येणार आहेत; तर या सगळ्या बस नॉन-एसी आहेत; तर जुलै महिन्यात एकूण ४४ वातानुकूलित बस परिवहनच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात ४८७ बसचा समावेश होणार आहे.
जुलैअखेर परिवहनकडे वातानुकूलित, सर्वसाधारण ९ मीटर आणि १२ मीटर लांबीच्या बसचा समावेश होणार आहे. नुकत्याच १३ बस दाखल झाल्या आहे; तर १० ई-बस रस्त्यावर धावत आहेत. यामुळे उत्पन्नात ९० हजारांची वाढ झालेली आहे. जुलैअखेर १२३ बसचा समावेश होणार आहे.
- भालचंद्र बेहरे, व्यवस्थापक, ठाणे परिवहन