ठाणे लवकरच दर्जेदार उच्च शिक्षणाचे केंद्र

Education
Education

ठाणे - मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद या शहरांच्या धर्तीवर ठाण्यातही उच्च शिक्षणाचे केंद्र निर्माण व्हावे आणि आयआयएम, आयआयटी यांच्या दर्जाच्या उच्च शिक्षण संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. खिडकाळी येथील ११३ हेक्‍टर जमिनीवरील आरक्षण बदलाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.

उच्च शिक्षणाच्या अनेक नामांकित संस्था राज्यात मुंबई-पुण्यात, तर देशात बेंगळुरु, हैदराबाद, दिल्ली आदी ठिकाणी आहेत. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईपर्यंत जावे लागते किंवा पुणे किंवा राज्याबाहेरच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास हॉस्टेलवर राहून शिक्षण पूर्ण करावे लागते. यामुळे शिक्षणाचा खर्चही वाढतो. त्यामुळेच ठाण्यात शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू होते. त्यादृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी चर्चा करून खिडकाळी येथील क्षेत्रावर उच्च शिक्षण केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेऊन या जागेवरील आरक्षण बदलाबाबतचा प्रस्ताव २०१६ मध्ये महापालिकेत मंजूर केला होता.

खिडकाळी येथील या ११३ हेक्‍टर क्षेत्रावर क्रीडा संकुल व हरित विभागाचे आरक्षण होते. त्यात बदल करून शैक्षणिक कारणाकरिता आरक्षित करण्याबाबतचा फेरबदल प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. 
आरक्षण बदलामुळे जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळणार आहे. वसई-अलिबाग या मल्टिमोडल कॉरिडॉरपासून अवघ्या २ किमीवर ही जागा असून जलवाहतूक, मेट्रो मार्ग, एमएमआरडीएचे ग्रोथ सेंटर अशा विविध प्रकल्पांमुळे खिडकाळीचे क्षेत्र उच्च शिक्षणासाठी योग्य असल्यानेच या जागेची निवड करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

केमिकल टेक्‍नोलॉजीचे स्वारस्य
राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ९ ऑक्‍टोबर २०१६ रोजी महापालिकेने पाठवला. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाला असून अनेक नामांकित शिक्षण संस्थांशी ठाणे महापालिका संपर्कात आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नोलॉजी (पूर्वीची यूडीसीटी) या संस्थेने स्वारस्यही दाखवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com