ठाण्याच्या चौपाटीचे रूपडे पालटणार 

ठाण्याच्या चौपाटीचे रूपडे पालटणार 

ठाणे - तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाची स्वतःची अशी ओळख आहे. ठाणेकरांची चौपाटी म्हणून हा तलाव ओळखला जातो. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा पालिका सज्ज झाली असून, त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या तलावाभोवती असलेल्या भेळपुरीच्या गाड्या, टांगेवाले यांच्यामुळे हा परिसर अस्वच्छ असतो. त्यामुळे पालिका करत असलेला नवा खर्च किती सार्थकी लागणार याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

ठाण्याच्या मासुंदा तलावावर केवळ ठाण्यातीलच नव्हे तर कल्याणपासून घाटकोपरपर्यंतचे लोक येत असतात. या तलावावर थकलेभागलेले नागरिक, प्रेमी युगुले, ज्येष्ठ नागरिक यांचा कायम राबता असतो. त्यामुळे ठाणेकरांची चौपाटी अशी या तलावाची ओळख झाली आहे. ही ओळख सार्थ ठरवण्यासाठी ठाणे पालिकेने पुन्हा एकदा मासुंदा तलाव परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार तलाव परिसरात कायमस्वरूपी लेझर शो सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. तलाव परिसरात ऍम्फी थिएटरही उभारण्याचा विचार आहे. त्यामुळे ठाण्यातील नागरिकांना मासुंदा तलावाच्या रूपाने एक हक्काचे पर्यटनस्थळ उपलब्ध होईल, असा विश्‍वास महापालिकेला वाटत आहे. 

सुशोभीकरणाचे 15 वर्षांचे कंत्राट 

मासुंदा तलावाचे सुशोभीकरण बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे. तलावाची निगा, देखभाल यांच्या जबाबदारीसह 15 वर्षांसाठी तो कंत्राटदारादाराकडे सोपवला जाणार आहे. त्या बदल्यात संबंधित कंत्राटदाराला जाहिरात करण्याची मुभा देऊन, त्यातून उत्पन्न मिळवण्याची संधी दिली जाणार आहे. 

प्रस्ताव किती व्यवहार्य? 

मासुंदा तलावाभोवती पाणीपुरीच्या गाड्या, टांगेवाले यांमुळे या परिसराची रया गेली आहे. या तलावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी याआधीही पालिकेने सुमारे चार कोटी खर्च केले होते. इतके करूनही या तलावाचे रूप फारसे बदलले नाही. त्यामुळे पालिकेचा आताचा प्रस्ताव किती व्यवहार्य ठरेल, अशी शंका काही सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

असा आहे प्रस्ताव 

तलावात साकारणार 60 बाय 30 मीटरच्या आकाराचा लेझर शो 

लेझर शोची उंची 16 मीटर 

तलावात म्युझिकल फाऊंटन 

एलईडी लाईटस्‌ 

तलाव परिसरात ऍम्फी थिएटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com