निविदा एकाला, कार्यादेश दुसऱ्याला, काम तिसऱ्याला! ठाणे पालिकेचा अजब कारभार

निविदा एकाला, कार्यादेश दुसऱ्याला, काम तिसऱ्याला! ठाणे पालिकेचा अजब कारभार

ठाणे  : ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर पालिका क्षेत्रात "आपला दवाखाना' (ई-हेल्थ स्मार्ट क्‍लिनिक) ही संकल्पना पुढे आली. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाच दवाखान्यांची संख्या आता महिन्याभरात 20 वर पोहोचली आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून ठाणेकरांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. या उपक्रमासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत "जॉईन्ट व्हेन्चर'मध्ये असलेल्या एका कंपनीला हे काम लागले. त्यामुळे नियमाप्रमाणे "आपला दवाखाना'चे काम या कंपनीच्या माध्यामतून सुरू होणे अपेक्षित असताना, पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे या कामाचे कार्यादेश निविदा प्रक्रियेत सहभागी नसलेल्या दुसऱ्याच कंपनीला काम देण्यात आल्याची अजब बाब समोर आली आहे. त्यामुळे हा उपक्रम अडचणीत आल्याची चर्चा आहे. 

दिल्लीतील "मोहल्ला क्‍लिनिक'च्या धर्तीवर ठाणे पालिका क्षेत्रात "आपला दवाखाना' ही संकल्पना राबविण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला. सत्ताधारी शिवसेनेने ही योजना मंजूर करून घेतली होती. त्यानुसार शहराच्या विविध भागात 50 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेत पुढील पाच वर्षांसाठी पालिका 160 कोटींचा खर्च करणार आहे. पालिकेने "मेडिकल ऑन गो प्रायव्हेट लिमिटेड'च्या माध्यमातून शहरामध्ये "आपला दवाखाना' ही संकल्पना निश्‍चित केली. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राज्य सरकारच्या जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालयामध्ये मोफत मिळणाऱ्या सुविधांसाठी "आपला दवाखाना'मध्ये 10 रुपये दर आकारला जाणार आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी यातील पाच दवाखान्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षांत एकही नवा दवाखाना संबंधित संस्थेला सुरू करता आला नाही. ही योजना सुरू करताना राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत "जॉईन्ट व्हेन्चर' असलेल्या संस्थेला हे काम लागले होते. त्यानुसार या कामाचा कार्यादेश काम लागलेल्या कंपनीला देणे अपेक्षित होते; मात्र ज्या कंपनीला हे काम देण्यात आले, ती कंपनी प्रत्यक्षात निविदा प्रक्रियेतच सहभागी नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या कंपनीला 11 जुलै 2020 मध्ये पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यादेशदेखील देण्यात आला. त्यामुळे आता संबंधित जॉईन्ट व्हेन्चरमधील या कंपनीने पालिकेला नोटीस बजावली आहे. येत्या 15 दिवसांत याचे उत्तर द्यावे; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशाराही कंपनीने दिला आहे. त्यामुळे "आपला दवाखाना' ही योजनाच अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. या संदर्भात, ठाणे पालिका वैद्यकीय अधिकारी राजू मुरुडकर यांना विचारले असता, माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर त्यांनी दिले. 

...असा उघड झाला घोळ 
ज्या कंपनीला कार्यादेश देण्यात आला होता, त्या कंपनीला हे काम करणे शक्‍य नसल्याने त्या कंपनीने हे काम "वन रुपी क्‍लिनिक'ला दिले. त्यानुसार वन रुपी क्‍लिनिकने यासाठी सुमारे दीड कोटी खर्च करून मागील दोन महिन्यापासून शहरात 20 दवाखाने सुरू केले. यामध्ये प्रत्येक दवाखान्यात रोजच्या रोज 80 ते 100 रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. रुग्णांकडून कोणत्याही स्वरूपाचे शुल्क आकारले जात नाही; परंतु केलेल्या दोन महिन्यांच्या कामाचा मोबदला मिळावा, यासाठी "वनरुपी क्‍लिनिक'ने जेव्हा पालिकेकडे पत्रव्यवहार केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आल्यानंतर हा घोळ उघडकीस आला. 

ठाणे शहरातील विविध भागांत मागील दोन महिन्यांपासून 20 ठिकाणी "आपला दवाखाना' सुरू केले. यासाठी दीड कोटींचा खर्च करण्यात आला आहे. असे असताना पालिका प्रशासनाने केलेल्या चुकीचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागत आहे. आम्ही केलेल्या कामाचे पैसे मिळत नसतील, तर आम्हाला आपला दवाखाना सुरू ठेवणे शक्‍य नाही. 
- डॉ. राहुल घुले,
संचालक, "वन रुपी' क्‍लिनिक

---------------------------------------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे )

thane marathi news Aapla Dawakhana project trouble mismanagement Thane Municipality

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com