कोरोनानंतर मुंबईवर ओढावलं 'हे' संकट, काळजी घ्या

पूजा विचारे
गुरुवार, 16 जुलै 2020

आज मुंबईत मरिन लाईन्स भागात इमारतीचा भाग कोसळला तर ठाण्यातही भिंत कोसळली. मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे दोन मजली इमारत कोसळली.

मुंबईः गुरुवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवारपासून मुंबईत पावसानं जोर धरला आहे. अशातच अनेक ठिकाणी भिंत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आज मुंबईत मरिन लाईन्स भागात इमारतीचा भाग कोसळला तर ठाण्यातही भिंत कोसळली. मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे दोन मजली इमारत कोसळली असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. 

गुरुवारी पहाटे मरिन लाईन्स परिसरात इमारतीचा एक भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

बुधवारी मुंबईतील पाववाला स्ट्रीटमध्ये घराचा एक भाग कोसळल्याने दोन जण जखमी झाले. या घटनेनंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

ठाण्यात भिंत कोसळली 

गुरुवारी सकाळी ठाणे शहरात निवासी इमारतीचा एक भाग कोसळला. कोपरी (पूर्वेकडील) गायत्री इमारतीत सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. तीन मजली इमारत 'अत्यंत धोकादायक' म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यात रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे फ्लॅटची बाल्कनी कोसळली. सुदैवाने, ही इमारत रिकामी करुन आणि सील केली असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

हेही वाचाः  काँग्रेसचा नेता विचारतोय, मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली?

शहरातील तब्बल 79 इमारती सी 1 श्रेणी अंतर्गत आहेत (याचा अर्थ अत्यंत धोकादायक आहे आणि त्वरित रिकामे करणे आवश्यक आहे). दरम्यान मुसळधार पावसाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफचे एक पथक ठाण्यात तैनात करण्यात आलं आहे. 

मालाड मालवणी भागात दोन मजली इमारत कोसळली

जोरदार पावसामुळे मालाडच्या मालवणी भागात दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. मालवणी परिसरातील अब्दुल हमीद मार्ग येथे प्लॉट क्रमांक 8 बी, गेट क्रमांक 5 येथे दुपारी अडीजच्या सुमारास ही घटना घडली. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाराच्या आत पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या चार गाड्या,  एक बचाव व्हॅन आणि एक रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत अग्निशमन दलाने दोन जणांना वाचवलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आलेत. 

अधिक वाचाः ठाण्यात बेड्सची कमतरता, तर कल्याण डोंबिवली कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी दोन जणांना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

thane marine lines Portion Of Building Malad House Collapse


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane marine lines Portion Of Building Malad House Collapse