लाल वादळानंतर आता आदिवासी  कष्टकऱ्यांचा आक्रोश

दिलीप पाटील
बुधवार, 14 मार्च 2018

वनातील जमिनीचा अधिकार कायद्याने 2006 साली मिळाला मात्र प्रत्यक्ष हक्काचा सात बारा मिळण्यासाठी आदिवासींच्या अख्या पिढीची हयात गेली, वारंवार मागण्या करूनही मोजणी, सर्वेक्षण, बैठका यांच्यातच आदिवासींच्या वाणाचा हक्क अडकून पडला आहे. सरकार सहा महिन्यांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचे सांगत आहे, मात्र ती कोण आणि कशी करणार यात मात्र स्पष्टता नाही

वाडा - साडेतीन दशकापेक्षा जास्त कालावधी आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या  विवेक पंडित  यांच्या श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली 19 मार्च रोजी हजारो आदिवासी मुंबईत धडकणार असल्याचे वृत्त आहे. वन हक्क, घरखालच्या जमिनी, रोजगार, कुपोषण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न अश्या अनेक मागण्या घेऊन हजारोंच्या संख्येने हे आदिवासी बांधव ठाण्यातुन लॉंग मार्चने आझाद मैदानात येऊन सरकारला जाब विचारणार आहेत. आदिवासींच्या या लॉंग मार्चने मुंबापुरी आता  “आदिवासी कष्टकरी, ढोर नाय,माणूस हाय, माणुसकीची भिक नको. हक्क हवा, हक्क  हवा,'  या  घोषणेने  दणाणून  उठणार आहे.  

वनातील जमिनीचा अधिकार कायद्याने 2006 साली मिळाला मात्र प्रत्यक्ष हक्काचा सात बारा मिळण्यासाठी आदिवासींच्या अख्या पिढीची हयात गेली, वारंवार मागण्या करूनही मोजणी, सर्वेक्षण, बैठका यांच्यातच आदिवासींच्या वाणाचा हक्क अडकून पडला आहे. सरकार सहा महिन्यांच्या कालावधीत अंमलबजावणी करण्याचे सांगत आहे, मात्र ती कोण आणि कशी करणार यात मात्र स्पष्टता नाही. आदिवासींच्या बेरोजगारीमुळे  दारिद्र्याचे विदारक वास्तव हजारो आदिवासी बालकांचा भूक बळी घेत असल्याचे दिसत आहे.घर त्याची जमीन, असे कायद्याने  सांगितले आहे. मात्र घरखालच्या जमिनीचे हक्काचे दाखले मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे.

ठाणे पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची ओरड जगभर होत असताना येथील बालकांच्या पोषण आहारासाठी येणार निधी आठ आठ महिने दिला जात नाही, ठेकेदारांचे पोषण करणारा नित्कृष्ट पाकीट बंद आहार मात्र नियमित पुरवला जात आहे. रेशनिंग च्या नावाखाली ठेकेदारांचे तर पोषण होते मात्र गरीब आदिवासींना मात्र रेशन आणि रेशनकार्ड मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागेल त्याला जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासारख्या अनेक प्रश्नांवर श्रमजीवी संघटना गेली अनेक वर्षे लढा देत आहे. या प्रश्नांवर तालुक्यात जिल्ह्यांत संघटनेने अनेक आंदोलनं केली, आता ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी कष्टकरी बांधव श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक (भाऊ) पंडित यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ठाण्यातून आझाद मैदान अशी  धडक देणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस  बाळाराम भोईर यांनी दिली.

Web Title: thane mumbai news agitation