कोंडीवर संतापाची टिवटिव!

किशोर कोकणे  
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

ठाणे - ठाणे-मुंब्रा बायपास दुरुस्ती कामासाठी बंद झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे कोंडी होत असताना आता या कोंडीचा संताप ठाणेकरांनी समाजमाध्यमांवर व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे. 

ठाणे पोलिसांच्या ‘ट्‌विटर’ खात्यावर वाहतूक व्यवस्थेविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून प्रत्येक १५ ते ३० मिनिटांनी वाहतूक समस्येविषयी नागरिक आपला रोष व्यक्त करू लागले आहेत. जर संबंधित प्रशासनाचा  एकमेकांसोबत समन्वय असता, तर कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला नसता असे ‘ट्‌विटर’वर व्यक्त होणाऱ्यांच्या प्रतिक्रियेतून दिसत आहे.

मुंब्रा बायपास दुरुस्तीसाठी बंद केल्यानंतर येथील शहरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी, कळवा, विटावा, घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात कोंडीची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच कल्याण येथील पत्रीपूलही बंद करण्यात आला आहे; तर डोंबिवली-उल्हासनगर, अंबरनाथ भागातही खड्ड्यांमुळे अंतर्गत मार्ग कोंडीत सापडलेले आहेत. 

खड्डे, वाहतूक बदल यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी ठाणेकरांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याचा प्रत्यय आता समाजमाध्यमांवर उमटू लागलेल्या प्रतिक्रियांमधून येत आहे. ठाणे पोलिसांच्या ट्‌विटर खात्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीसंबंधीच्या तक्रारी येऊ लागल्या असून यात वाहतूक कोंडी, रस्त्यात वाहने बंद पडणे, रस्त्यांवर खड्डे या तक्रारींचा सामावेश आहे. वाहतूक व्यवस्थेविरोधात नागरिक आपला संताप या माध्यमातून व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे सरकारला आता जाग येईल का, असा सवाल नागरिक करत आहेत. संबंधितांवर कारवाईची मागणी करण्‍यात येत आहे.

व्यवस्थेचे वाभाडे
ट्विटर खात्यावर वाहतूक, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचे वाभाडे काढण्यात येत आहेत. ठाणे पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेविषयी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वाहतूक पोलिसांचे व्यवस्थापन दयनीय असल्याचा आरोप येथील रहिवासी करतात; तर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे विटलेल्या नागरिकांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे निगरगट्ट अधिकाऱ्यांना जाग येईल का, असा सवाल निर्माण होत आहे.

कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला आहे. खड्डे भरण्यासाठीही आम्ही राज्य रस्ते महामंडळाला पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच वाहतूक पोलिसांना मेगा-फोन्सही देण्यात आले आहेत.
- अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग

Web Title: Thane-Mumbra Bypass traffic