टीएमटी ‘गॅस’वर; थकबाकीसाठी महानगर गॅसने बजावली नोटीस

Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन तुटवडा यामुळे मेटाकुटीला आलेल्या टीएमटीचा कारभारच आता गॅसवर आहे. कारण, टीएमटीच्या बसेसना सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) या कंपनीची थकबाकी तब्बल 10 कोटींच्यावर पोहचली आहे.त्यामुळे महानगर गॅसने टीएमटीसह ठाणे महापालिका प्रशासनाला थकबाकी तातडीने भरण्याचे निर्देश नोटीसीद्वारे दिले आहेत.

टीएमटीच्या ताफ्यात सुमारे 360 बसेस असून त्यातील 103 बसेस सीएनजीवर धावतात.2006 सालापासून महानगर गॅस कंपनीकडून सीएनजी पुरवठा केला जातो. यासाठी एमजीएलमार्फत दर पंधरवड्याला टीएमटीला देयके दिली जातात.मात्र,अपुऱ्या अर्थपुरवठ्यामुळे गॅसची ही बिले तातडीने अदा करण्यात टीएमटीकडून दिरंगाई होत आहे. अखेरचे बिल 15 मे 2018 रोजी टीएमटीकडून अदा करण्यात आले असून त्यानंतर 1 जून ते नोव्हेंबर 2018 पर्यंत गॅसची देयके न दिल्याने ही थकबाकी तब्बल 10 कोटी 10 लाख 91 हजार इतकी झाली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी एमजीएलने टीएमटीला डेडलाइन दिली नसली तरी तातडीने रक्कम जमा करण्याचे निर्देश नोटीशीद्वारे पालिकेचे मुख्य लेखापाल (कॅफो) महेश वाघीरकर आणि टीएमटीचे प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांना पाठवली आहे. दरम्यान, थकबाकी न भरल्याने एमजीएलद्वारे टीएमटीचा सीएनजी पुरवठा खंडित केल्याने प्रवाश्यांची आबाळ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टीएमटीचा आर्थिक गाडा रुळावर आणण्याचे काम सुरु आहे. एमजीएलची थकबाकी असली तरी, वस्तुस्थिती भिन्न आहे.टीएमटी आणि एमजीएल यांच्यात तेव्हा झालेल्या करारनाम्यातील तरतुदी कालबाह्य झाल्यात.तसेच, अडीच कोटींचे देयक असताना एमजीएलने साडेसात कोटींचा दंड लावल्याने आकडा वाढला.ठाणे मनपा आणि एमजीएल दोन्ही शासकीय आस्थापना असल्याने याबाबत लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेवून तोडगा काढला जाईल.|
- संदीप माळवी, ठामपा उपायुक्त, महाव्यवस्थापक, टीएमटी

महानगर गॅस लि.चे असि.व्हॉईस प्रेसिडेंट रमेश नारायणन यांनी 22 नोव्हे.2018 रोजी ठाणे मनपाला पाठवलेल्या पत्रात 15 मे 2018 पर्यंतची देयके अदा केल्याचे नमूद आहे.1 जून ते 23 नोव्हे.पर्यंत गॅसचे देयक एकूण 2 कोटी 50 लाख 66 हजार इतकेच असून या रक्कमेचे विलंब शुल्क आकार 7 कोटी 60 लाख 24 हजार असे एकूण 10 कोटी 10 लाख 91 हजार थकबाकी दर्शवण्यात आली आहे.याचधर्तीवर पुढील अडीच महिन्याच्या देयकांची आकडेवारी जोडल्यास थकबाकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com