ठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले 

ठाणे पालिकेचे पाच कोटी बुडवले 

ठाणे -  ठाणे परिवहन सेवेच्या बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर मिळालेल्या बसथांब्यावर वारेमाप जाहिरात करून आपला गल्ला भरणाऱ्या सोल्युशन ऍडव्हर्टायझिंग कंपनीला महापालिकेच्या जाहिरात विभागाने गुरुवारी दणका दिला. तब्बल पाच कोटी 21 लाख रुपयांचे उत्पन्न बुडविल्याचा ठपका ठेवत कंपनीचा ठेकाच रद्द करण्याची नोटीस महापालिकेच्या जाहिरात विभागाने बजावली आहे. 

टीएमटीचे तब्बल 415 बसथांबे सोल्युशन कंपनीकडे जाहिरातीसाठी आहेत. होर्डिंगच्या जाहिरातींवर कायम राजकारण्यांच्या वाढदिवसांचे आणि अन्य कार्यक्रमांचे अतिक्रमण होत असल्याने अन्य जाहिरातदारांकडून टीएमटीच्या बसथांब्यांना नेहमी प्राधान्य दिले जाते. जून 2013 ते डिसेंबर 2017 या कालावधीत मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केल्यानंतरही महापालिकेच्या जाहिरात विभागाला त्या मोबदल्यात सोल्युशन ऍडव्हर्टायझिंग कंपनीकडून कर भरण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या जाहिरात विभागाचे उपायुक्त संदीप माळवी यांनी या कंपनीला पाच कोटी 21 लाख रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. जाहिरातदार कंपनीला कोट्यवधींची नोटीस पाठवण्याची महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ असून, पंधरा दिवसांत यापैकी पन्नास टक्के रक्कम भरली न गेल्यास थेट टीएमटीच्या जाहिरातीचा ठेका रद्द करण्याचा इशारा कंपनीला महापालिकेकडून देण्यात आला आहे. 

कागदपत्रांच्या पडताळणीनंतरच नोटीस 
संबंधित कंपनीने त्यांचे आयकर विवरण पत्र, ऑडिट रिपोर्ट आणि बॅंकांचे तपशील सादर केल्यानंतर ही नोटीस बजाविण्यात आल्याचे ठाणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यात महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी हा कर भरला न गेल्यास करारनामा रद्द करण्याबरोबरच संबंधित कंपनीच्या विरोधात जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुळात महापालिकेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असल्याचे या निमित्ताने निदर्शनास आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. टीएमटीसंबंधीत अनेक सुरस कथा सातत्याने ऐकावयास मिळत असताना जाहिरात कंपनीनेच कोट्यवधी रुपये भरण्याचेच टाळल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. 

सोल्युशन कंपनीने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर या कंपनीने जाहिरात विभागाचा कर भरला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच या विषयावर कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय आमच्या विभागाने घेतला आहे. याची सुनावणी ऑगस्ट महिन्यात झालेली आहे. त्यानंतर काही कालावधी संबंधित कंपनीने मागितला होता; पण त्यानंतरही रक्कम न भरल्यास ठेका रद्द करण्याचा निर्णय नक्की घेतला जाणार आहे. 
संदीप माळवी, महापालिका उपायुक्त, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com