ठाणे पालिकेत शिपाई आणि पहारेकरी भिडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल आजच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला, पण या वेळी भाजपच्या काही नगरसेवकांनी नव्या सरकारचे स्वागत केलेले असताना गटनेते नारायण पवार यांनी मात्र शिवसेनेची संभावना शिपाई असल्याची केली.

ठाणे : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल आजच्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला, पण या वेळी भाजपच्या काही नगरसेवकांनी नव्या सरकारचे स्वागत केलेले असताना गटनेते नारायण पवार यांनी मात्र शिवसेनेची संभावना शिपाई असल्याची केली. त्याला प्रत्युत्तर देताना महापौर नरेश म्हस्के यांनी आम्ही शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक असून सत्तेची लालसा आम्हाला नसून प्रसंगी पक्षासाठी झाडू मारण्याची तयारी असल्याचा टोला पवार यांना लगावला.

स्थायी समितीचे सभापती राम रेपाळे यांनी आजच्या सर्वसाधारण सभेत महाआघाडीचे सरकार स्थापन होण्याबरोबर महापौर आणि उपमहापौर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्या वेळी राष्ट्रवादी आणि काँगेसच्या नगरसेवकांनी आता राज्यात चांगली कामे होतील अशी भावना व्यक्त केली. तसेच भाजपच्या काही नगरसेवकांनीही राज्यात सरकार स्थापन झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच महापौर नरेश म्हस्के यांच्या साथीने शहरात चांगली विकास कामे होतील अशी अपेक्षा व्यक्त केली; मात्र या वेळी नारायण पवार यांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपने युतीमध्ये लढवल्या आहेत. त्यानंतर झालेल्या घडामोडींनंतर आम्ही आता पहारेकऱ्याच्या भूमिकेत गेलेलो असून ही भूमिका चांगल्या प्रकारे निभावणार असल्याचे सांगितले. त्याच वेळी सत्ताधारी शिवसेनेला उद्देशून तुम्ही आता शिपाई झाला असल्याचा टोला लगावला. त्यानंतर मात्र सभागृहातील महाआघाडीचे सर्वच नगरसेवक आक्रमक झाले होते.

टीकेमुळे महापौरही संतापले

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या वेळी पवार यांना असे बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच महापौरही या टीकेमुळे संतापले होते. त्यांनी सांगितले, की सत्तेसाठी आम्ही काहीही करण्यास कधीही तयार नसतो. केवळ पक्ष देईल तो आदेश पाळणारे आम्ही सैनिक आहोत. पक्षाने मान दिल्यानेच या पदावर आता बसलो आहे, पण भविष्यात पक्षासाठी झाडू मारण्याची वेळ आली तर त्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शपथ घेतल्याने तुमचा राग अनावर झाला आहे, तुमचे बेगडी हिंदुत्व आम्हाला माहिती झाले आहे. आम्हाला तुमच्याकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane municipality fight between gurds and peon