ठाणे पालिकेने हिरावले विद्यार्थ्यांचे मैदान 

ठाणे : हाजुरी येथे सुरू असलेले डाटा सेंटरचे काम (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : हाजुरी येथे सुरू असलेले डाटा सेंटरचे काम (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कोणत्याही स्थितीत मुलांच्या खेळांच्या मैदानाचे संरक्षण व्हावे, ही माफक अपेक्षा असते; पण या अपेक्षेला सध्या तरी ठाणे महापालिकेने हरताळ फासला आहे. हाजुरी येथील उर्दू शाळेच्या मैदानात "डाटा सेंटर' उभारणीचा घाट घालण्यात आला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी थेट डाटा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर जागा उपलब्ध करून "अफलातून' कल्पना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेत सुचवली आहे. विशेष म्हणजे या विषयावर आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारीही या सूचनेनंतर शांत बसल्याचे पाहावयास मिळाले. 

हाजुरी येथे महापालिकेची उर्दू माध्यमाची शाळा आहे. या शाळेसमोर असलेल्या मैदानात "डाटा सेंटर' उभारणीचा घाट महापालिकेकडून घालण्यात आला आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या पुढाकाराने येथील मुलांनी सोमवारी (ता. 1) थेट महापालिकेवर मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला होता. या विषयावर मुलांनीच आवाज उठविला असल्याने महापालिकेतील लोकप्रतिनिधी या विषयाकडे संवेदनशील नजरेने पाहतील, अशी अपेक्षा होती; पण आजच्या घडीला तरी या लोकप्रतिनिधींना शाळेच्या मैदानाऐवजी "डाटा सेंटर'ची इमारत महत्त्वाची ठरली आहे.

मंगळवारच्या (ता. 3) सर्वसाधारण सभेत या खेळाच्या मैदानाचा विषय राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी शिक्षण मंडळाचे सभापती विकास रेपाळे यांनी डाटा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर या मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची आगळीवेगळी मागणी केली. 

शाळेसमोरील मैदानाचा आकार हा फारच कमी आहे. त्यामुळे मुलांना तिथे खेळणेही शक्‍य होत नाही. त्यामुळे डाटा सेंटरच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांना तशा स्वरूपाची जागा किंबहुना मैदान उपलब्ध करून देण्याची सूचना रेपाळे यांनी केली.

त्याला प्रशासनाने थेट मंजुरी दिलेली नाही; पण मुळात मुलांचे खेळाचे मैदान बंद करून त्यांना थेट सिमेंटच्या इमारतीमध्ये थेट दुसऱ्या मजल्यावर खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विकास रेपाळे यांची सूचना आजच्या घडीला चर्चेचा विषय ठरली आहे. मैदानी खेळाचा आनंद या मुलांना सिमेंटच्या इमारतीवर कसा मिळणार, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

पालकांचा डेटा सेंटरला विरोध कायम 
ठाण्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात सुमारे आठ ते दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रस्त्यावरील गुन्हे रोखण्यासाठी तसेच गुन्हा घडल्यानंतर त्याचे चित्रीकरण होण्यासाठी हे सीसीटीव्हींचे जाळे विणण्यात आले आहे. त्यासाठी खास नगरसेवक निधी वापरण्यात आला आहे. या साऱ्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे एकत्रित नियंत्रण करण्यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरूपात हाजुरी येथे "डाटा सेंटर' सुरू करण्यात आले आहे; पण ही जागा कमी असल्याने नवी जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नवे डाटा सेंटर थेट शाळेच्या मैदानात उभारले जाणार असल्याने परिसरातील शाळकरी मुलांसह त्यांच्या पालकांचा या डाटा सेंटरला विरोध आहे; पण या विरोधाची दखल स्थानिक लोकप्रतिनिधीच घेण्यास तयार नसल्याने या मुलांचे मैदान हिरावले जाणार असल्याचे मानले जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com