ठाणे पालिकेचे बॉलीवूड पार्क वादात?

ठाणे महापालिका
ठाणे महापालिका

ठाणे : घोडबंदर रोडवरील थीम पार्कच्या चौकशी अहवालाचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे. अशावेळी लोकमान्यनगर येथील बॉलीवूड पार्कमधील आठ कोटींची शिल्पे गेली कुठे? असा प्रश्न आजच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या वतीने उपस्थित करण्यात आला. पण यावेळी थीम पार्क, बॉलीवूड पार्क या दोन्ही विषयाची सरमिसळ झाल्याने आठ कोटींच्या शिल्पांचा प्रश्न अंधातरीच राहिला. भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी सर्वसाधारण सभेत लोकमान्यनगर येथील बॉलीवूड पार्कचा विषय उपस्थित केला होता. 

कर्जत येथे सुरू असलेल्या कामासाठी पालिकेने आतापर्यंत आठ कोटी रुपये संबंधित ठेकेदाराला दिलेच कसे? असा प्रश्न नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला. तसेच अधिकारी कर्जत येथे जाऊन त्या कामाची पाहणी करणार होते, अशी पाहणी झाली का? अशी विचारणा केली. पण त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी या प्रश्नाचा संबंध थीम पार्कबरोबर जोडून या विषयाची चौकशी अजून सुरू असून त्याचा अहवाल सभागृहासमोर सादर केल्यानंतर या विषयावर बोलण्याचा सल्ला भाजपाच्या नगरसेवकांना दिला.

या विषयावरून भाजपचे गटनेते नारायण पवार, मिलिंद पाटील आदी आक्रमक झाले होते. पण वारंवार सत्ताधारी आणि प्रशासनाकडून या विषयावर थेट उत्तर देणे टाळले जात होते. विषय वाढत असल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. 

महापालिकेचे अधिकारी सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषय आणि प्रश्नोत्तरांची माहिती घेऊन उपस्थित असतात. अशाप्रकारे अचानक कधीही कोणताही विषय उपस्थित केल्यास त्याची तातडीने माहिती देणे शक्‍य नसते. त्यानंतरही कोणाला त्याची माहिती हवी असल्यास ती लेखी मागितल्यास प्रशासनाकडून त्यांना लेखी माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच यापूर्वी थीम पार्कबाबत प्रशासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल आलेला असून त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. पण लोकप्रतिनिधींच्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नसल्याने त्यावर आतापासून सभागृहात चर्चा करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. 

पालिका अधिकारी अनभिज्ञ
लोकमान्यनगर येथील बॉलीवूड पार्कमध्ये साकारण्यात येणारे शिल्प संबंधित ठेकेदाराला त्याच्या कर्जत येथील जागेवर तयार करण्याची परवानगी महापालिकेकडून देण्यात आली होती. पण अशी परवानगी दिल्यानंतर दीड वर्षे झाले तरी कोणतेही शिल्प अद्याप ठेकेदाराने या जागेवर आणणलेले नाही. एवढेच नव्हे तर तब्बल आठ कोटी रुपये दिल्यानंतर नक्की कोणती शिल्पे साकारली याची माहिती देखील महापालिका अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच काम पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या ठेकेदाराला आठ कोटी रुपये कोणत्या आधारावर दिले जातात, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com