दिव्यात मीटर फोटोविरहित बिले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

ठाणे - दिव्यात वर्षभरापासून येथील शेकडो वीजग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीजबिल वितरित केले जात असून अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारले जात आहे. अत्यल्प वीज वापरणारे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करणाऱ्या नागरिकांना या वीज बिलांच्या वाढत्या रकमा भरता येत नसल्यामुळे महावितरणच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. 

ठाणे - दिव्यात वर्षभरापासून येथील शेकडो वीजग्राहकांना मीटरचा फोटो नसलेले वीजबिल वितरित केले जात असून अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारले जात आहे. अत्यल्प वीज वापरणारे आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गुजराण करणाऱ्या नागरिकांना या वीज बिलांच्या वाढत्या रकमा भरता येत नसल्यामुळे महावितरणच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. 

विशेष म्हणजे यावेळी अधिकाऱ्यांपेक्षा दलालांकडूनच या ग्राहकांना लक्ष्य करून त्यांच्याकडून त्यांची अडचण सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे, असा आरोप खुद्द ग्राहकांनी केला आहे. दिव्यातील महावितरणच्या कार्यालयांत तक्रारी करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या समस्येला तोंड द्यावे लागत असल्यामुळे ग्राहकांकडून महावितरणविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या परिसरातील दिवा परिसरात प्रत्येक दिवशी नव्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. दैनंदिन जीवनातील विजेची गरज भागवण्यासाठी येथील मंडळींना सतत महावितरण कार्यालयावर अवलंबून राहावे लागते. दिवसातील पाच ते सहा तास या भागात वीज बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त असताना या भागातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. विशेष म्हणजे या भागातील वीजबिलांवर मीटरचे फोटोच छापण्यात येत नसल्यामुळे या बिलांवर विश्‍वास तरी कसा ठेवावा, असा प्रश्‍न या भागातील नागरिकांना पडला आहे. बिलांची तक्रार घेऊन महावितरणच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथे नागरिकांची लूट करण्यासाठी दलालांची मोठी फौजच बसलेली असते. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांची समस्या सोडवण्याचा दावा करून नागरिकांकडून मोठ्या रकमा वसूल करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिव्यात महावितरणची वाताहत
दिव्यातील महावितरणची दिवसेंदिवस वाताहत होत असून रोज वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहे. दुसरीकडे महावितरणची व्यवस्था खंगत चालल्याने वरिष्ठ अधिकारीही हतबलता व्यक्त करत आहेत. दोन वर्षांपूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत प्रचंड तफावत आहे. हाताखालचे कर्मचारी ऐकत नाहीत, दिलेली कामे पूर्ण करत नाहीत. चुकीच्या गोष्टी करत असल्यामुळे त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची वेळ महावितरणवर येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

Web Title: thane new electricity bill