लग्नाचे आमिष दाखवून 13 महिलांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

25 लाखांना गंडा घालणारा विवाहित अटकेत

25 लाखांना गंडा घालणारा विवाहित अटकेत
ठाणे - "जीवनसाथी' आणि "शादी डॉट कॉम' या संकेतस्थळांवर खोटी माहिती देऊन उच्चशिक्षित अविवाहित महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्यास नालासोपारा पोलिसांनी मंगळवारी (ता. 8) अटक केली. कृष्णा चंद्रकांत देवकाते असे आरोपीचे नाव असून, आतापर्यंत त्याने राज्यभरातील 13 मुलींना सुमारे 25 लाखांचा गंडा घातल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.

ठाण्याच्या उच्चभ्रू वस्तीत राहणारा कृष्णा उच्चशिक्षित आहे. तो कोणतीही नोकरी किंवा व्यवसाय करत नाही. तो विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे. विधवा, घटस्फोटित किंवा वयाने जास्त असलेल्या उच्चशिक्षित व नोकरी करणाऱ्या महिलांना तो जाळ्यात ओढायचा. त्यांना विवाहविषयक संकेतस्थळांवरून रिक्वेस्ट पाठवून लग्नाबाबत आमिष दाखवून आणि वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळायचा. कृष्णा याने विवाहविषयक दोन संकेतस्थळांवर प्रज्ज्वल देशमुख या नावाने बनावट खाते उघडले होते. त्यावर, "मला दोन लाख पगार आहे, मुंबईत घर आहे' अशी माहितीही त्याने पोस्ट केली होती.

कृष्णाची माहिती पाहून नालासोपारा येथील एक उच्चशिक्षित महिला त्याच्या जाळ्यात अडकली. तिच्याशी जवळीक साधून कृष्णाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. "मी रिलायन्स कंपनीत नोकरीला असून मला दोन लाख पगार आहे. पण; कंपनीत काम करताना माझ्याकडून एका चुकीच्या कागदपत्रावर स्वाक्षरी झाली. त्यामुळे मला कंपनीला काही पैसे नुकसानभरपाई म्हणून द्यायचे आहेत. त्याकरिता मला तत्काळ पैशांची गरज आहे,' असे त्याने संबंधित महिलेला सांगितले. त्या महिलेने त्याच्यावर विश्‍वास ठेवला. कृष्णाने तिच्याकडून तब्बल आठ लाख 58 हजार 300 रुपये उकळले.

पैसे मिळताच मोबाईल बंद
पैसे खात्यात जमा झाल्यावर मोबाईल बंद करून कृष्णा फरारी झाला होता. फसवणूक झालेल्या महिलेने त्याच्याविरुद्ध 21 जुलै रोजी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी कृष्णाचा शोध घेऊन त्याला अटक केली. आतापर्यंत राज्यातील 13 मुलींना त्याने अशाच प्रकारे गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती वसईचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी दिली.

नालासोपारा - विवाहस्थळाच्या संकेतस्थळांवरून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कृष्णा देवकातेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: thane news 13 women cheating