ठाण्यात क्‍लस्टरचे राजकारण? 

ठाण्यात क्‍लस्टरचे राजकारण? 

ठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी 24 मे रोजी क्‍लस्टरच्या अधिसूचनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता; मात्र यात घोडबंदर पट्ट्यातील गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, ओवळा या महत्त्वाच्या गावांची नावे वगळण्यात आली आहेत, असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. ही गावे ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात येत नसल्याने त्यांची नावे वगळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आगरी-कोळी बांधवांच्या मतांसाठी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते क्‍लस्टरवरून राजकारण करत आहेत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपड्या, बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी प्रशासनातर्फे क्‍लस्टर योजना (समूह पुनर्विकास योजना) राबवण्यात येत आहे. या योजनेला शहरातील गावठाण आणि कोळीवाडा भागातील रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. ठाणे महापालिकेच्या स्थापनेनंतर तयार करण्यात आलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ग्रामपंचायत काळातील घरे अधिकृत करण्याबाबतचे धोरण राबवण्यात आले नाही. त्यामुळे या बांधकामांना बेकायदा असा शिक्का बसला आहे. तसेच कुटुंब सदस्यांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक ग्रामस्थांनी या बांधकामांवर बेकायदा वाढीव मजले चढवले आहेत. बेकायदा ठरलेल्या या बांधकामांचा महापालिकेने क्‍लस्टर योजनेत समावेश केल्याने येथील नागरिकांनी विरोधाचा सूर लावला आहे. चारच दिवसांपूर्वी घोडबंदर भागातील कासारवडवली, मोघरपाडा, वाघबिळ, बाळकुम, कोलशेत, कोळीवाडा, भाईंदरपाडा आणि विटावा भागातील रहिवाशांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात येऊन या योजनेस लेखी हरकती नोंदवल्या. आता येथे आगरी-कोळी गावांमध्ये बॅनरबाजी सुरू झाली आहे. नगरसेवक संजय भोईर यांनी या क्‍लस्टर योजनेसंदर्भात अधिसूचना रद्द करून रीतसर मंजुरी घेऊन नव्याने अधिसूचना व आराखडा प्रसिद्ध करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यासंबंधीचे बॅनर परिसरात लागले आहे; मात्र यात कासारवडवली, गायमुख, ओवळा म्हणजेच ओवळा विधानसभा मतदार संघातील गावांची नावे नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीत संजय भोईर किंवा त्यांचे वडील ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना ज्या मतदार संघातून तिकीट मिळणार आहे, त्या भागांचीच नावे लिहिल्याची तक्रार गायमुख, ओवळा, कासरवडवली भागातील ग्रामस्थ करत आहेत. 

अन्याय होत असल्याची भावना  
समूह विकास योजनेत समावेश करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांना 322 चौरसफुटांचे घर मिळणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर अन्याय होण्याबरोबरच गावाची संस्कृतीही लोप पावणार आहे. त्यामुळे या योजनेस आमचा विरोध असून तशा स्वरूपाच्या 500 हून अधिक लेखी हरकती महापालिकेकडे नोंदवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

क्‍लस्टरच्या अधिसूचनेवर आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. यात एखाद्‌ दुसऱ्या गावाचे नाव लिहायचे राहिले म्हणून त्याचे राजकारण न करता त्याला राजकीय वळण घेऊ नये. 
- संजय भोईर, नगरसेवक 

शेतकरी-गावकरी मार्गदर्शन महासभा 
रविवारी सायंकाळी बाळकूम येथे शेतकरी-गावकरी मार्गदर्शन महासभा होणार होती. या सभेत क्‍लस्टरविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे; मात्र या सभेत लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही. जनतेचा आवाज सभागृहात पोहचवण्यासाठी प्रतिनिधींना बोलावणे आवश्‍यक होते; मात्र याचे निमंत्रण दुपारी उशिरापर्यंत पोहोचले नसल्याचे संजय भोईर यांनी सांगितले; मात्र ग्रामस्थांसाठी सर्वांनी एकत्र यावे, त्यासाठी कोणालाही निमंत्रणाची गरज नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com