अपक्ष नगरसेवकाची हत्या टोळी वर्चस्वातून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

ठाणे - पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार याच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक केली आहे. ही हत्या टोळीच्या वर्चस्ववादातून झाल्याचे समोर आले असून, अटक चौकडीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारेही हस्तगत केली आहेत. यातील मुख्य सूत्रधार अक्षय ऊर्फ बबलू सुरवसे हा एका हत्या प्रकरणात महिनाभरापूर्वीच कारागृहातून सुटला होता.

खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी याला दुजोरा दिला. पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप दिलीप पवार (वय 38) याच्यावर स्टेशन रोडवरील एका हॉटेलात जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने सूत्रधार अक्षय सुरवसे (रा. सांगली), पुंडलिक वनारे, मनोज शिर्सेकर आणि भक्तराज धुमाळ (रा. तिघेही पंढरपूर) या चौकडीला अटक केली असून, सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

Web Title: thane news corporator murder gangwar crime