विनयभंग करून तरुणीला रिक्षातून फेकले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

ठाणे - रिक्षात बसलेल्या तरुणीशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहप्रवाशाने रिक्षाचालकाच्या मदतीने तिला मारहाण करून धावत्या रिक्षातून रस्त्यावर फेकल्याची घटना बुधवारी रात्री ठाणे येथे घडली. या घटनेत जबर जखमी झालेल्या तरुणीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणारी पीडित तरुणी मुलुंड येथील एका फिटनेस सेंटरमध्ये डायटिशियन म्हणून काम करते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ती घरी जाण्यासाठी ठाण्यातील तीन हात नाका परिसरात उभ्या असलेल्या एका शेअर रिक्षात बसली. त्या रिक्षात आधीच एक तरुण बसला होता. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर त्या तरुणाने अश्‍लील शेरेबाजी करत तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध दर्शवल्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा मानपाडाऐवजी पोखरण क्रमांक दोनकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निर्जन भागात नेली. दरम्यानच्या वेळेत त्या तरुणीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी तिला मारहाण केली. तरुणीने प्रतिकार सुरूच ठेवल्याने त्या दोघांनी तिला पोखरण रोडवरील एका कंपनीच्या गेटसमोर धावत्या रिक्षातून फेकले.
Web Title: thane news crime in thane