चेंदणी कोळीवाड्यात ‘एक गाव एक गोविंदा’

श्रीकांत सावंत
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

ठाणे - शहरात दहीहंडी उत्सवाचे बाजारीकरण, व्यावसायिकीकरण आणि राजकारणी स्वरुप आले असतानाच शहरातील चेंदणी कोळीवाडा परिसरात १४० वर्षांहून अधिक काळापासून बाळगोपाळ गोविंदा पथकाकडून ‘एक गाव एक गोविंदा’ उपक्रम राबवला जात आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून पारंपरिक दहीहंडी उत्सवाची जोपासना केली जात आहे. 

ठाणे - शहरात दहीहंडी उत्सवाचे बाजारीकरण, व्यावसायिकीकरण आणि राजकारणी स्वरुप आले असतानाच शहरातील चेंदणी कोळीवाडा परिसरात १४० वर्षांहून अधिक काळापासून बाळगोपाळ गोविंदा पथकाकडून ‘एक गाव एक गोविंदा’ उपक्रम राबवला जात आहे. विशेष म्हणजे, या माध्यमातून पारंपरिक दहीहंडी उत्सवाची जोपासना केली जात आहे. 

ठाण्यातील कोळीवाड्यात अनेक शतकांपासून गोपाळकाला हा उत्सव साजरा होतो. संस्कृतीचे जतन केले जाते. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे रेल्वेगाडी धावल्यानंतर चेंदणी कोळीवाड्याचे पूर्व आणि पश्‍चिम असे दोन भाग झाले. १८८० मध्ये पश्‍चिमेकडील भागामध्ये दत्तमंदिराची स्थापना झाली. तेव्हापासून या भागामध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्तमंदिरातील मानाची दहीहंडी फोडून हा उत्सव साजरा केला जात होता. कोणत्याही प्रायोजकाशिवाय केवळ लोकवर्गणीतून हा उत्सव साजरा केला जात होता. 

आजही परंपरेनुसार ‘एक गाव एक गोविंदा’ हा उत्सव येथे साजरा केला जातो. गावाची व्याप्ती वाढल्यानंतर या भागामध्ये सध्या दोन सामाजिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. युनायटेड स्पोर्टस्‌ क्‍लब आणि आनंद भारती समाज यांच्या माध्यमातून दोन गोविंदा पथके तयार करण्यात आली आहेत; तसेच माणिक भारती या गोविंदा पथकाचीही याच भागात सुरुवात झाली.

‘एक गोविंदा’ संकल्पना जोपासणारे कोळीवाडे...
ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्याव्यतिरिक्त महागिरी, राबोडी, विटावा येथील कोळीवाड्यात ‘एक गाव एक गोविंदा’ ही संकल्पना राबविली जाते. ठाण्याच्या आजूबाजूच्या बाळकुम, ओवळा, कोलशेत, वडवली या भागांतही याच पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. कोळीवाड्यातील गोविंदा पथके पैसे मिळवण्यासाठी दहीहंडी फोडत नाहीत; तर गावातील पारंपरिक खेळ म्हणून दहीहंडी फोडली जाते. २५ रुपयांपासून १०१ रुपयांपर्यंतचे बक्षीस ही पथके स्वीकारत असतात. 

रस्ते अडवून उभ्या केलेल्या मंचावरून आयोजकांकडून आणि राजकारण्यांकडून कर्कश आवाजामध्ये साजरा केलेल्या दहीहंडीला आमचा विरोध आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ‘संकल्प’, ‘संघर्ष’, ‘संस्कृती’च्या नावाखाली केला जाणारा खेळ आम्हाला मान्य नाही. त्यांच्यामुळेच न्यायालयाला आमच्या गोविंदा उत्सवामध्ये हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. 
- गिरीश साळगावकर, बाळगोपाळ गोविंदा पथक

Web Title: thane news dahihandi