ठाण्यातील दहीहंडी उत्सव 

श्रीकांत सावंत
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

ठाणे  - रहदारीच्या चौकात भव्य मंडप बांधून आजूबाजूचे रस्ते बंद करून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा उन्माद माजवणाऱ्या ठाण्यातील दहीहंडी आयोजकांना कायद्याचा चांगलाच धाक बसला आहे. रस्ते अडवून ढणढणाट आणि नागरिकांची कोंडी करणाऱ्या दहीहंडी उत्सवाला सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढाईतून विरोध केला आहे. यंदा न्यायालयाचे आदेश पाळून कायद्याच्या चौकटीत बसणारा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केल्यामुळे शहरात काही वर्षांपासून सुरू असलेला दहीहंडीचा उन्माद काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाल्याने ठाणेकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

ठाणे  - रहदारीच्या चौकात भव्य मंडप बांधून आजूबाजूचे रस्ते बंद करून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दहीहंडीचा उन्माद माजवणाऱ्या ठाण्यातील दहीहंडी आयोजकांना कायद्याचा चांगलाच धाक बसला आहे. रस्ते अडवून ढणढणाट आणि नागरिकांची कोंडी करणाऱ्या दहीहंडी उत्सवाला सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयीन लढाईतून विरोध केला आहे. यंदा न्यायालयाचे आदेश पाळून कायद्याच्या चौकटीत बसणारा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केल्यामुळे शहरात काही वर्षांपासून सुरू असलेला दहीहंडीचा उन्माद काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात झाल्याने ठाणेकरांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

ठाण्यातील "संघर्ष' संस्थेतर्फे आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाचपाखाडी येथे दहीहंडी साजरी होत असून दोन वर्षांपूर्वी दहीहंडीचा हा उत्सव बंद करण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांची कोंडी करणारा, ध्वनिप्रदूषण करणारा हा उत्सव बंद झाल्यानंतर येथील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला. दहीहंडी उत्सवाचे पीडित असलेल्या या भागातील प्रदीप सोसायटी परिसरातील नागरिकांनी यंदाही येथे दहीहंडी नसल्याने समाधान व्यक्त केले आहे; तर शहरातील अनेक आयोजकांनी रस्त्यावर दहीहंडी साजरी करण्यापेक्षा मैदानात हंडी उभारणे सुरू केले आहे. आमदार रवींद्र फाटक यांच्या "संकल्प' प्रतिष्ठानने रघुनाथनगर परिसरातील रस्त्यावर होणारा उत्सव गेल्या वर्षीपासून मैदानात घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे येथील परिसरही मोकळा झाला आहे. मराठी सण वाचवण्याचा दावा करत मैदानात उतरणाऱ्या मनसेनेही दहीहंडीतूनही कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच भगवती मैदानात ही दहीहंडी होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या "संस्कृती प्रतिष्ठान'ची दहीहंडीही प्रति वर्षीप्रमाणे मैदानावर होणार असून त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास टळू शकणार आहे. 

शिवसेना नेत्यांची भर रस्त्यामध्ये दहीहंडी 
शहरातील दहीहंडीच्या आयोजकांनी सबुरीचा मार्ग अवलंबला असताना खासदार राजन विचारे यांच्यातर्फे होणारी दहीहंडी मात्र शहरातील महत्त्वाच्या चिंतामणी चौकात होणार आहे. या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तेथून पुढे शिवसेनेची पारंपरिक टेंभी नाक्‍यावरची दहीहंडी होणार आहे. या दोन्ही दहीहंड्या भर रस्त्यात असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. या ठिकाणाच्या अवघ्या बाजूलाच शिवाजी मैदानासारखे विस्तृत मैदान असताना खासदार विचारे यांची दहीहंडी रस्त्यावरच होणार आहे. शहरातील अंतर्गत भागात होणाऱ्या छोट्या-मोठ्या दहीहंड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. वागळे परिसरात छोट्या दहीहंड्यांमुळे रस्ते अडणार असून वाहतुकीला फटका बसणार आहे. 

दहीहंडी आयोजकांकडून कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांचा प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या झोम- 1 अंतर्गत येणाऱ्या 60 मोठ्या आणि 286 छोट्या-मोठ्या आयोजक आणि मंडळांना नोटिसा देऊन कायद्याचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. 14 वर्षांखालील मुलांना दहीहंडीपासून दूर ठेवणे, विम्याचे संरक्षण, आवश्‍यक सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी मंडळांकडून करण्याची सूचना दिली आहे. 
- डॉ. डी. एस. स्वामी, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक. 

न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली असून अनेकांना दिलासा मिळाला आहे. शांतता क्षेत्राजवळ पोलिसांकडून आयोजकांना परवानगी नाकारली जात आहे. हे बदल दिलासादायक आहेत. सण-उत्सव साजरे करणे महत्त्वाचे असूनही त्यामुळे अन्य व्यक्तींना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मनमानीपणाला चाप बसत असून हा बदल महत्त्वाचा आहे. 
- डॉ. महेश बेडेकर, जनहित याचिकाकर्ते. 

दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सगळ्या गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी त्यांना आवश्‍यक साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे. या ठिकाणाचा विमा काढण्यात आला असून पाऊस नसल्यास मैदानात गाद्याही टाकण्यात येतील. सुरक्षेची चोख व्यवस्था यंदा दहीहंडीत करण्यात आली आहे. 
- अविनाश जाधव, दहीहंडी आयोजक (मनसे). 

Web Title: thane news dahihandi