पोखरण रस्त्याला मद्यपींचे ग्रहण!

श्रीकांत सावंत
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

ठाणे - ठाण्यातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यांचे सुशोभीकरण केल्यानंतर आता या विस्तीर्ण रस्त्यांवर विविध प्रकारचे अतिक्रमण होत आहे. पोखरण रस्ता क्रमांक १ या सुशोभित रस्त्याला चक्क मद्यपींचे ग्रहण लागले आहे. शहरातील मद्यपी या रस्त्याच्या बाजूला बसून मुक्तपणे दारू पित आहेत. विशेष म्हणजे, सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू असून, दारू पिऊन मद्याच्या बाटल्या त्याच ठिकाणी फेकून ही मंडळी निघून जात आहेत. या भागात अत्यंत टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून, स्थानिकांना याचा त्रास होत आहे.पोलिस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. 

ठाण्यातील शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाऊन दारू पिणाऱ्यांनी येऊर आणि उपवन परिसर व्यापून टाकला आहे. या मद्यपींकडून होणाऱ्या त्रासामुळे या भागातील अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील मद्यपींविरुद्ध स्थानिक नागरिक अधिक कठोर होऊन संघर्ष करत आहेत; परंतु येऊर आणि उपवन भागातील मद्यपींची संख्या रोडावली असली, तरी आता सुशोभित आणि विस्तीर्ण अशा पोखरण रस्त्यावर या मद्यपींनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. या भागातील रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या छोट्या उद्यानांत दारूच्या बाटल्यांचा खच वाढू लागल्यामुळे नागरिकांना यामुळे इजा होण्याची शक्‍यता आहे. सायंकाळी आणि रात्रीच्यावेळी येथून एकट्या दुकट्या महिलेस प्रवास करणेही कठीण झाले आहे. 

या भागात पोलिसांनी व्यापक कारवाई करण्याची गरज असून, पेट्रोलिंग करून येथील मद्यपींना वचक बसवण्याची मागणी होत आहे. ठाणे सिटीझन व्हाईस या संस्थेने पोखरण रस्त्यावरील वाढत्या उपद्रवामुळे चिंता व्यक्त केली आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्याची देखभाल करण्याची गरज आहे, असे संस्थेचे कॅसबर ऑगस्ट्रीन यांनी सांगितले.

पोखरण रस्त्यावर पोलिसांकडून वारंवार कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या बीट मार्शल्स आणि पीसीआर कारमधून या भागात लक्ष ठेवले जात आहे. मद्य प्राशन करणारे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. 
- प्रदीप गिरीधर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वर्तकनगर पोलिस ठाणे  

ठाण्यातील पोखरण रस्त्याचे नूतनीकरण झाले असून, शहरातील सुंदर रस्त्यांमध्ये याची मोजणी केली जाते. या रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे काही दिवस झाले नाहीत तोच या रस्त्यावर अतिक्रमणे सुरू झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा छोटी उद्याने तयार करण्यात आली आहेत; परंतु अशा रस्त्याच्या कडेला बसून मद्यपी मद्य प्राशन करून बाटल्यांचा कचरा तेथेच फेकतात. 
- डॉ. रहेश रवींद्रन, रहिवासी

Web Title: thane news drinker issue