कोठारी कम्पाऊंडवर हातोडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

ठाणे - मानपाडा येथील वादग्रस्त कोठारी कम्पाऊंडमधील वाढीव बांधकामांवर अखेर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत दिवसभरात ५ वाढीव बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. गेल्या दोन सभेत हा विषय सर्वाधिक चर्चेचा झाला होता. त्यामुळे आजची सभा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने येथील बांधकामांवर कारवाई सुरू केली; मात्र ही कारवाई कितपत गांभीर्याने होणार, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोठारी कम्पाऊंडमधील बेकायदा सुरू असलेले बार, पब, हुक्का पार्लर यांच्या बेकायदा बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्या वेळी कोठारी कम्पाऊंडमधील बांधकामांवर कारवाई न झाल्यास पुढील सर्वसाधारण सभाच होऊ देणार नसल्याची भूमिका महापौर मीनाक्षी शिंदे यांनी घेतली होती. महिन्यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत कोठारी कम्पाऊंडमधील बांधकामांवर हातोडा न टाकल्याने महापौरांनी सभा तहकूबही केली होती.

ही सभा तहकूब झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने येथील वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नोटीस बजावली होती. तसेच बांधकामांत अंतर्गत बदल केले असतील, तर अशा बांधकामांनाही नोटीस बजावण्यात आली होती. यामध्ये हुका पार्लर, पब, बार आदींचा समावेश होता. त्यानंतर शुक्रवारी महासभा सुरू  होण्याआधीच पालिकेने आपला मोर्चा कोठारी कम्पाऊंडकडे वळवला. त्यानंतर येथील वाढीव बांधकामांवर हातोडा टाकला. दिवसभरात येथील पाच वाढीव बांधकामांवर कारवाई झाली. केवळ वाढीव बांधकामांवरच कारवाई करण्यात आली. 

पालिकेतर्फे ज्या बांधकामधारकांनी नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केले होते, अशा बांधकामांवर पहिल्या टप्प्यात हातोडा टाकण्यात आला; तर दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत काही बदल केले असतील किंवा परवानगी न घेता हुक्का पार्लर, बार अथवा पब सुरू असतील अशांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सभेत दिली.

कारवाईचे समर्थन; महापौरांचे कौतुक
आजच्या सभेत सभागृह नेते नरेश म्हस्के , विरोधी नेते मिलिंद पाटील आदींनी कोठारी कम्पाऊंडवर झालेल्या कारवाईचे समर्थन करीत महापौर मीनाक्षी शिंदे यांचे कौतुक केले; तर शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी येथील बांधकामांवर काय कारवाई झाली हे माहीत नाही; परंतु शहराच्या इतर भागातही अशा पद्धतीने ज्या वापरासाठी परवानगी घेतली होती, ते न उभारताच त्या ठिकाणी प्रशस्त अशी हॉटेल्स उभारण्यात आली आहेत, अशा बांधकामांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: thane news encroachment