राजकीय किल्लेबांधणी! 

मयूरी चव्हाण-काकडे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

कल्याण - राजकीय पक्ष जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध सण आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांकडे प्रभावी माध्यम म्हणून पाहतात. याच पार्श्‍वभूमीवर दिवाळीनिमित्त राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पोस्टरबाजी सुरू झाली आहे. सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक आणि अन्य पदाधिकारीही दिवाळीच्या शुभेच्छांचे औचित्य साधून मतदारसंघातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

नवरात्रोत्सवातनंतर आता दिवाळीतही पक्षांकडून सध्या प्रतिष्ठेच्या झालेल्या राजकीय मार्केटिंगसाठी अनोखे फंडे अवलंबले जात आहेत. आपल्या प्रभागात खास अभ्यंगस्नानासाठी नागरिकांना सुगंधी उटणे भेट म्हणून देण्यास नगरसेवकांनी पसंती दिली आहे. एका कुटुंबास साधारण दोन ते तीन उटण्याची पाकिटे आणि सोबत नगरसेवकाची माहिती आणि फोटो, पक्षाचे चिन्ह असलेले शुभेच्छापत्र, पणत्या, आकाशकंदील, रांगोळीची पाकिटे आदी साहित्य नगरसेवकांनी बनवून घेतले असून ते वितरित करण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. 

आमदार आणि खासदारांकडून विविध वयोगटातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी किल्लेबांधणी, रांगोळी स्पर्धांसह भव्यदिव्य दिवाळी पहाट कार्यक्रमांचे नियोजन सुरू आहे. यंदा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कल्याण शहरात मराठीतील दिग्गज कलाकारांना घेऊन ‘दिवाळी पहाट’चा भव्यदिव्य कार्यक्रम घेतला आहे. कंदील, पणत्या खरेदीसाठी, शुभेच्छापत्राच्या प्रिंटिंगसाठी उल्हासनगरच्या बाजारपेठेला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. 

विशेष भेटवस्तू 
विशेषतः आमदार-खासदारांकडून कार्यकर्ते आणि इतर खास व्यक्तींसाठी मिठाईचा बॉक्‍स भेट म्हणून दिला जातो. यात ड्रायफ्रुट्‌स, दोन ते तीन प्रकारच्या मिठाईसोबत गुलाब जामचा एक मोठा डबा आणि स्नॅक्‍सचा समावेश असतो. या बॉक्‍सची ऑर्डर बाजारातील ब्रॅण्डेड मिठाई उत्पादकांनाच दिली जाते. एका कंपनीकडून साधारण १५०-२०० मिठाई बॉक्‍सची ऑर्डर दिली जाते; तर मोठ्या कंपन्यांकडून तुलनात्मक जास्त ऑर्डर दिली जाते. गरजेनुसार ताजी मिठाई बनवली जाते आणि होलसेलच्या दरात विकली जाते, अशी  माहिती ठाणे येथील टीप-टॉप प्लाझाचे व्यवस्थापक कमलेश गोर यांनी दिली.  

Web Title: thane news fort