खारफुटीवरील भराव जैसे थे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

ठाणे - ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्यासाठी ठाणे महापालिकेने खारफुटीची कत्तल करून त्यावर डांबरी रस्त्याची निर्मिती केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डेब्रिज हटवण्याच्या नावाखाली महापालिकेने चक्क यावर वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील खारफुटीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याला विरोध करून हे डेब्रिज येथून कायमचे हटवण्याची मागणी केल्याने वृक्षारोपणासाठी गेलेल्या प्रभाग समिती अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले.

ठाणे - ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्यासाठी ठाणे महापालिकेने खारफुटीची कत्तल करून त्यावर डांबरी रस्त्याची निर्मिती केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर डेब्रिज हटवण्याच्या नावाखाली महापालिकेने चक्क यावर वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न केला; परंतु येथील खारफुटीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याला विरोध करून हे डेब्रिज येथून कायमचे हटवण्याची मागणी केल्याने वृक्षारोपणासाठी गेलेल्या प्रभाग समिती अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले. या भागातील खारफुटीच्या कत्तलीविषयी वारंवार तक्रारी; तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असतानाही महापलिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.

ठाण्यातील कोपरी परिसरात खाडीच्या बाजूला खारफुटीची जंगले असून याच भागातील स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्याचा मार्ग महापालिका प्रशासनाने विस्तृत केला आहे. त्यावर निवडणुकीपूर्वी डांबराचे थर देऊन पक्का रस्ता तयार करण्यात आला. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर या प्रकरणी महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला; तर २४ एप्रिलला उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी महापालिका प्रशासनाला पत्र देऊन येथील रस्ता नष्ट करणे, डेब्रिज उचलून टाकणे आणि येथील खारफुटीची भूमी पुन्हा निर्माण करण्याचे आवाहन केले होते. 

महापालिका प्रशासनाने या भागातील डेब्रिज उचलण्यासाठी पाठवलेल्या पथकाने डेब्रिज उचलण्याऐवजी ते खारफुटीवर पसरवून रस्त्याची रुंदी अधिकच वाढवली होती. त्यानंतर पालिकेने हे डेब्रिज उचलून त्या ठिकाणी खारफुटीची झाडे लावणार असल्याचे स्पष्ट केले. शनिवारी कोपरी प्रभाग समिती सहायक आयुक्त अनुराधा बाबर, महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह पालिकेचे पथक या भागात वृक्षारोपणासाठीही गेले. ही मंडळी खारफुटीची झाडे या डेब्रिजवर लावणार होती. त्यापूर्वीच पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी या पथकाला झाडे लावण्यापासून थांबवले. नैसर्गिक वातावरण जोपासण्यास अपयशी ठरलेले प्रशासन आता कृत्रिम पद्धतीने खारफुटी लावण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु हे चुकीचे असून निसर्गतः उगवलेली खारफुटीच योग्य असून खारफुटी रोपणासारखे कार्यक्रम करणे चुकीचे आहे, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला. या प्रकरणी कोपरीच्या सहायक आयुक्त अनुराधा बाबर यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. 

कोपरी परिसरातील खारफुटीवर डेब्रिजचा भराव टाकून त्यावर महापालिकेने रस्ता बांधला आहे. हा रस्ता काढून तेथील परिस्थिती नैसर्गिक खारफुटीसाठी देण्याची गरज आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कृत्रिम व्यवस्था करण्याची आवश्‍यकता नाही. आमचा या डेब्रिजवरील वृक्षारोपणाला विरोध असून हे डेब्रिज हटवल्याशिवाय आम्ही या भागात वृक्षारोपण करू देणार नाही. येथील रस्ताही बेकायदा असून तो हटवण्याऐवजी पालिका वृक्षारोपण करून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे.
- रोहित जोशी, ठाणे जिल्हा कांदळवन समिती सदस्य.

रस्ता झालेल्या भागामध्ये काही ठिकाणी खारफुटी नसून त्या ठिकाणी खारफुटी प्रजातीतील झाडे लावण्यात येतील; तर काही ठिकाणी आवश्‍यकतेनुसार खारफुटी लावली जाईल. या भागातील डेब्रिज उचलून रस्त्याच्या बरोबरीने आणण्यात आले आहे; परंतु येथील तक्रारदाराकडून आणखी डेब्रिज हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. 
- मनीषा प्रधान, प्रदुषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका.

Web Title: thane news garbage TMC